व्यावसायिकाच्या घरी चोरी करुन पळून गेलेल्या नोकराला अटक
चोरीच्या गुन्ह्यांतील साडेसात लाखांची कॅश तक्रारदारांच्या स्वाधीन
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – व्यावसायिकाच्या घरी साडेसात लाखांची कॅश चोरी करुन पळून गेलेल्या नोकराला खार पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीची संपूर्ण साडेसात लाखांची कॅश पोलिसांनी हस्तगत केली असून ही कॅश मंगळवारी तक्रारदारांना परत करण्यात आली आहे. आठवड्यापूर्वीच गुन्हा दाखल होताच खार पोलिसांनी पळून गेलेल्या नोकराला अटक करुन त्याच्याकडून संपूर्ण कॅश हस्तगत करुन ती कॅश परत केल्याने तक्रारदारांनी खार पोलिसांचे आभार व्यक्त केले.
चेतन बलराम चंदन हे कापड व्यपारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत खार परिसरात राहतात. त्यांच्याकडे घरकाम करण्यासाठी दोन पूर्णवेळ नोकर असून त्यात संतोष याचा समावेश होता. व्यवसायानिमित्त त्यांना अनेक कॅशची गरज पडत असल्याने ते त्यांच्या कपाटात काही रक्कम ठेवत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी कपाटात तेरा लाखांची कॅश ठेवली होती. २५ सप्टेंबरला तो नेहमीप्रमाणे जेवण बनवत होता. काही वेळानंतर तो घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला. याबाबत त्यांनी इतर नोकरांना विचारणा केली, मात्र त्यांना संतोषविषयी काहीच माहिती नव्हती.
सायंकाळी त्यांनी कपाटातील काही कॅश काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना कपाटातून साडेसात लाखांची कॅश मिसिंग असल्याचे दिसून आले. त्यांनी सर्वत्र कपाटात कॅशचा शोध घेतला, मात्र त्यांना कुठेच सापडली नव्हती. त्यातच संतोष हा अचानक घरातून निघून गेला होता. त्यामुळे त्यांनी त्याला कॉल केला होता, यावेळी त्याने तो अलीबागला असल्याचे सांगून झारखंड येथील गावी जात असल्याचे सांगितले. संतोषनेच कपाटातील साडेसात लाखांची कॅश चोरी करुन घरातून पलायन केले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध चेतन चंदन यांनी खार पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या संतोषचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना संतोषला गुरुवारी १ ऑक्टोंबरला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ही कॅश चोरी करुन पलायन केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली साडेसात लाखांची कॅश पोलिसांनी हस्तगत केली आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जप्त केलेली कॅश मंगळवारी पोलीस उपायुक्तांच्या हस्ते चेतन चंदन यांना परत करण्यात आली. यावेळी त्यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.