गुंतवणुकीवर पाच टक्के व्याजासह दुप्पट रक्कमेच्या आमिषाने गंडा

५२ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – कंपनीतील गुंतवणुकीवर पाच टक्के व्याजासह दोन वर्षांत दुप्पट रक्कम देणयचे आमिष दाखवून आठजणांची सुमारे ५२ लाखांची चारजणांच्या टोळीने फसवणुक केल्याचा प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या दोन्ही मालकासह चौघांविरुद्ध नेहरुनगर पोलिसांनी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. मोहम्मद नियाज मोहम्मद जमीर शेख, कलीम गौसी शेख, शहिस्ता कलीम शेख आणि गौसी शेख अशी या चौघांची नावे आहेत. आतापर्यंत पोलिसांकडे आठजणांची तक्रार प्राप्त झाली असून आगामी काळात आणखीन काही तक्रारदार पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे फसवणुकीची ही रक्कम आणखीन वाढण्याची भीती व्यक्त आहे.

अन्वर मोहिद्दीन बाशा यांचा रेडीमेड कपडे विक्रीचा व्यवसाय असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कुर्ला येथे राहतात. दहा वर्षापूर्वी त्यांना किडनीचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे ते एमआय कंपनीकडून आयुवैदिक औषध घेत होते. याच दरम्यान त्यांची रिझवान कुरेशी यांच्याशी ओळख झाली होती. त्यांच्यासोबत मोहम्मद नियाज शेख हा काम करत होता. त्यामुळे तोदेखील त्यांच्या परिचित झाला होता. ऑक्टोंबर २०२३ रोजी त्याने त्यांना भेटण्यासाठी बोलाविले होते. त्यामुळे ते मोहम्मद नियाजला भेटण्यासाठी गेले होते. या भेटीदरम्यान त्याने पार्टनरशीपमध्ये एक कंपनी सुरु केली आहे. या कंपनीत गुंतवणुक केल्यास दरमाह पाच टक्के व्याज मिळेल. दोन वर्षांत गुंतवणुक रक्कम दुप्पट होईल असे सांगून त्यांना त्याच्या कंपनीत गुंतवणुकीचा सल्ला दिला होता.

मात्र त्यांनी कंपनीत गुंतवणुक करण्यास नकार दिला होता. तरीही तो त्यांना वारंवार कॉल करुन गुंतवणुकीबाबत विचारणा करत होता. याच दरम्यान त्याने त्यांची कलीम शेखसोबत ओळख करुन देताना तो त्यांच्या कंपनीत पार्टनर असल्याचे सांगितले होते. त्यांनी बोट ब्रो नावाची कंपनी सुरु असून या कंपनीचे मुख्य कार्यालय दुबईत आहे. त्यांनी त्यांना पाच टक्के व्याजासहीत दुप्पट रक्कमेचे आमिष दाखविले होते. त्यांचा विश्‍वास बसावा म्हणून त्यांनी त्यांना दुबईत नेले होते. तेथील अल-मुसा टॉवरमध्ये आणून त्यांचे कार्यालय दाखविले. त्यांच्यासोबत तिथे इतर काही गुंतवणुकदार आले होते. तिथे दोन दिवस राहिल्यानंतर ते मुंबईत आले होते.

मुंबईत आल्यानंतर त्यांनी त्यांच्यासह पत्नी आणि मुलीच्या नावाने सुरुवातीला प्रत्येकी दहा हजाराची गुंतवणुक केली. त्यानंतर जानेवारी २०२४ रोजी त्यांनी त्यांचे राहते घर हेव्ही डिपॉझिटवर देऊन साडेचार लाखांची मुलीच्या नावाने गुंतवणुक केली.ही रक्कम त्यांनी मोहम्मद नियाजला दिली होती. काही दिवसांनी त्यांनी त्यांना इतर नातेवाईक, मित्रांना तसेच परिचित लोकांना कंपनीत गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यास सांगून त्यावर त्यांना चांगले कमिशन देऊ असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मित्रांना ही माहिती सांगून आरोपीसोबत ओळख करुन दिली होती. यावेळी या दोघांनी कंपनीत आतापर्यंत अनेकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केली असून त्यात त्यांना चांगला फायदा झाला आहे. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपटी खरेदी केली आहे असे सांगितले.

त्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांचा मेहुणा अस्लम शेखने साडेचौदा, भाचा युनूस शेख याने साडेनऊ लाख, मित्र कासिम शेखने तेरा, शब्बीर शेख पावणेचार लाख, मोहम्मद इस्त्राईल सव्वालाख, हेलन फर्नाडिसने एक लाख, अमजद खानने ४० हजार, साहिल खानने वीस हजाराची कंपनीत गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना सहा महिने नियमित व्याजाची रक्कम मिळत होती. २०२५ साली आरोपींनी कंपनीचे नाव बदलून क्रॉस मार्केटिंग ठेवले होते. यावेळी त्यांनी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी गुंतवणुक रक्कमेवर दहा टक्के व्याजाची नवीन योजना सुरु केली होती. त्यामुळे अन्वर बाशा यांनी कंपनीत आणखीन साडेचार लाखांची गुंतवणुक केली होती. काही महिने व्याजाची रक्कम दिल्यानंतर त्यांनी ही रक्कम देणे बंद केले होते.

याबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींनी कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणुक होत असून कंपनीची वेबसाईट हँग होत असल्याचे सांगितले. डिसेंबर २०२५ पर्यंत सर्वांना गुंतवणुक रक्कमेवरील व्याज मिळतील असे सांगितले. मात्र त्यांनी व्याजासह दुप्पट रक्कम दिली नाही. आरोपीवर विश्‍वास ठेवून अन्वर बाशा यांनी नऊ लाख तर इतर नातेवाईकासह मित्रांनी ४३ लाख ५३ हजार असे ५२ लाख ५३ हजाराची कंपनीत गुंतवणुक केली होती, मात्र त्यांना कुठलाही परवाता न देता त्यांनी सर्वांची फसवणुक केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी नेहरुनगर पोलिसांत मोहम्मद नियाज, त्याची पत्नी शाहिस्ता शेख, वडिल गौसी शेख, कलीम शेख यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या चारही आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुक तसेच महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून चारही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page