व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी देणार्या बहिणींविरुद्ध गुन्हा दाखल
उंदीर असलेल्या डोसाचा व्हिडीओ व्हायलसह पोलिसांत तक्रारीची धमकी देऊन
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – उंदीर असलेला डोसाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देऊन बोरिवलीतील एका हॉटेल व्यावसायिकाकडे २५ लाखांची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी दोन बहिणींविरुद्ध बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मानसी अमीत आचार्य आणि किंजल सुभाष भाटिया अशी या दोन महिलांची नावे आहेत. या दोघींनाही सोमवारी खंडणीचा सहा लाखांचा दुसरा हप्ता घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. या दोघींची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
जय किशोर शाह हे हॉटेल व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कांदिवली परिसरात राहतात. त्यांचा बोरिवलीतील एल. टी रोड, डायमंड सिनेमागृहाजवळ राधाकृष्ण फास्टफुड नावाचे एक हॉटेल आहे. २४ सप्टेंबरला त्यांच्या हॉटेलमध्ये मानसी आचार्य ही दोन पुरुष आणि एका लहान मुलासोबत आली होती. यावेळी त्यांनी म्हैसूर डोसाची ऑर्डर केली होती. अर्धा डोसा खाल्यानंतर तिच्यासोबत आलेल्या अमीत त्रिवेदीला डोसामध्ये एक उंदीर असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी हॉटेलमध्ये प्रचंड धिंगाणा घातला होता. तिथे पोलिसांना बोलावून त्यांनी उंदीर असलेल्या डोसाचे व्हिडीओ बनविले होते.
ही माहिती नंतर त्यांना हॉटेलचे मॅनेजर अली मंडल आणि चंद्रशेखर मेनन यांच्याकडून समजली होती. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांच्या हॉटेलची प्रचंड बदनामी झाली होती. त्यांच्या हॉटेलचे लायसन्स अन्न व औषध विभागाने सस्पेंड केला होता. तेव्हापासून म्हणजेच २८ सप्टेंबरपासून त्यांचा हॉटेल बंद आहे. या घटनेनंतर त्यांच्या हॉटैलच्या मोबाईलवरुन अज्ञात व्यक्तीकडून ती व्हिडीओ क्लिप आणखीन व्हायरल करण्याची धमकी मिळत होती. याबाबत हॉटेल मालकांनी माफी मागावी अशी संबंधित व्यक्तीकडून मागणी केली जात होती. ३० सप्टेंबरला त्यांना मानसीने कॉल करुन त्यांच्या हॉटैलमध्ये डोसामध्ये उंदीर सापडल्याने त्यांच्या नातेवाईकांच्या जिवीतास बेतले होते, त्यामुळे त्यांनी २५ लाख रुपये भरपाई म्हणून द्यावी अशी मागणी केली.
तिने पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून तिला पोलिसांकडून बोलाविले जात आहे. तक्रार करु नये म्हणून तुम्हाला नुकसानभरपाई द्यावी लागेल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी तिला त्यांच्या हॉटेलमध्ये बोलाविले होते. त्यामुळे मानसी ही तिची बहिण किंजल भाटियासोबत हॉटेलमध्ये गेली होती. त्यांच्यात घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती त्यांनी त्यांच्याकडे २५ लाखांची मागणी केली. मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी दोन्ही बहिणींना रक्कम करण्याची विनंती केली. यावेळी त्यांच्यात सात लाखांमध्ये समझौता झाला होता. टोकन म्हणून त्यांनी त्यांना एक लाख रुपये दिले.
मात्र उर्वरित रक्कमेसाठी त्या दोघींही त्यांना सतत कॉल करत होते. उर्वरित सहा लाख रुपये दिले नाहीतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्यांनी बोरिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही बहिणीकडून त्यांना खंडणीसाठी धमकी दिली जात असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची पोलीस निरीक्षक दिग्विजय पाटील यांनी गंभीर दखल घेत कारवाई करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांच्या सूचनेनंतर त्यांनी दोन्ही बहिणींना कॉल करुन त्यांच्या हॉटेलजवळ बोलाविले होते.
सोमवारी सायंकाळी मानसी आचार्य आणि किंजल भाटिया या दोघीही खंडणीचा दुसरा हप्ता घेण्यासाठी त्यांच्या हॉटेलजवळ आले होते. यावेळी या दोघींनाही सहा लाखांची कॅश घेताना तिथे पाळत ठेवलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी जय शाह यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मानसी आचार्य आणि किंजल भाटिया यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोन्ही बहिणींची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.