मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टची भीती दाखवून फसवणुक

१.५५ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या कटातील दोन आरोपींना अटक

0

अरुण सावरटकर
३ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टची भीती दाखवून एका वयोवृद्ध महिलेला १ कोटी ५५ लाखांना गंडा घालणार्‍या दोन आरोपींना उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. यश योगेश चव्हाण आणि समीर बाळू भोसले अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. दोन्ही आरोपी गुन्ह्यांतील मुख्य आरोपींच्या संपर्कात होते, त्यांच्या सांगण्यावरुन त्यांनी वेगवेगळ्या बँकेत खाती उघडल्याचे तसेच या बँक खात्याचा फसवणुकीसाठी वापर झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हा दाखल होताच ते दोघेही गेल्या सहा महिन्यांपासून फरार होते, अखेर सहा महिन्यानंतर या दोघांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

८८ वर्षांच्या तक्रारदार महिला मालाड परिसरात एकटीच राहत असून एका खाजगी कंपनीतून ती सेवानिवृत्त झाली आहे. ७ एप्रिल २०२६ रोजी घरी असताना तिला संदीप राव नावाच्या व्यक्तीचा कॉल आला. त्याने तो नाशिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून तिच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत वॉरंट जारी झाले आहे. तिच्या आधारकार्डवरुन नाशिक येथील एका बँकेत खाते उघडण्यात आले असून त्यात मनी लॉडिंगची रक्कम जमा झाली होती. त्यामुळे तिची चौकशी होणार आहे. नाशिकमध्ये तिच्या परिचित कोणीही आहे का, त्या कधी नाशिक येथे आल्या होत्या का याबाबत विचारणा केली असता तिने तिच्या परिचित कोणीही नाशिकमध्ये राहत नसल्याचे सांगितले. काही वेळानंतर जॉर्ज मॅथ्यू नावाच्या तपास अधिकार्‍याने तिच्या केससंदर्भातील काही कागदपत्रे पाठविले होते. तसेच तिच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेले वॉरंट पाठवून तिला डिजीटल अरेस्टची भीती दाखविली होती.

तिने त्यांना चौकशीत मदत केल्यास संबंधित अधिकारी तिला या संपूर्ण प्रकरणातून बाहेर काढतील असे आश्‍वासन दिले होते. याच दरम्यान त्याने तिच्या बँक खात्यासह इतर गुंतवणुक आणि प्रॉपटीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. चौकशी पूर्ण होईपर्यंत तिला एका बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात आले, चौकशी पूर्ण होताच ही रक्कम तिच्या बँक खात्यात पाठविण्यात येईल. ७ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत तिने अटकेच्या भीतीने त्याने दिलेल्या बँक खात्यात टप्याटप्याने १ कोटी ५५ लाख १० हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम ट्रान्स्फर केल्यानंतर काही दिवस तिची चौकशी झाली नाही. संबंधित अधिकार्‍याने चौकशी पूर्ण होताच तिची रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचे आश्‍वासन दिले होते,

मात्र त्याने ती रक्कम तिच्या बँक खात्यात पाठविली नाही. याच दरम्यान तिला डिजीटल अरेस्टमुळे काही लोकांची सायबर ठगांकडून फसवणुक होत असल्याचे बातमी वाचण्यात आली होती. तिचीही अशाच प्रकारे फसवणुक झाल्याचा संशय व्यक्त करुन तिने घडलेला प्रकार तिच्या बहिणीला सांगितला. तिने तिला डिजीटल अरेस्ट हा प्रकार नसून पोलीस कधीही कॉलद्वारे चौकशी करत नाही. तिची सायबर ठगांकडून फसवणुक झाली असून तिने पोलिसांत तक्रार करावी असा तिला सल्ला दिला. त्यानंतर तिने उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी संदीप राव आणि जॉर्ज मॅथ्यू नाव सांगणार्‍या दोन्ही तोतया पोलिसांविरुद्ध पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुकीसह खंडणीसाठी धमकाविणे तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन या पथकाने चेंबूरच्या रमाबाई आंबेडकर कॉलनीत राहणार्‍या यश चव्हाण आणि समीर भोसले या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. तपासात ते दोघेही या कटातील मुख्य सायबर ठगांच्या संपर्कात होते, त्यांच्याच सांगण्यावरुन त्यांनी वेगवेगळ्या बँकेत खाती उघडून त्याची माहिती त्यांना पुरविली होती. याच बँक खात्यात तक्रारदार महिलेच्या फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. याकामी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page