हत्येच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या आरोपीस सतरा वर्षांनी अटक
प्रॉपटीच्या वादातून परिचिताची हत्या करुन पळून गेला होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – हत्येच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका वॉण्टेड आरोपीस मुलुंड पोलिसांनी अटक केली. फिरोज मेाहम्मद सुलेमान शेख असे या ३९ वर्षीय आरोपीचे नाव असून हत्येच्या याच गुन्ह्यंत त्याला मुलुंड येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गावच्या प्रॉपटीवरुन मसकूर या परिचित व्यक्तीने फिरोजसह इतर तिघांनी डोक्यात हातोड्याने मारहाण करुन हत्या केली होती. या हत्येनंतर तो पळून गेला होता. अखेर सतरा वर्षांनी त्याला हत्येच्या गुन्ह्यांत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
२० जून २००९ रोजी मुलुंड येथे मसकूर नावाच्या एका व्यक्तीची त्याच्या परिचित फिरोज, अफरोज व इतर दोन सहकार्यांनी हत्या केली होती. त्यांच्यात गावच्या प्रॉपटीवरुन वाद सुरु होता. याच वादातून मसकूरचा कायमचा काटा काढण्यासाठी त्यांनी त्याच्या हत्येचा कट रचला होता. ठरल्याप्रमाणे मसकूरची डोक्यात हातोडा घालून या चौघांनी हत्या करुन पलायन केले होते. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत या हत्येत फिरोज शेख याचा सहभाग उघडकीस आला होता, मात्र हत्येनंतर तो पळून गेला होता. गुन्हा घडल्यानंतर तो वेगवेगळ्या ठिकाणी स्वतचे अस्तित्व बदलून राहत होता.
तो गावी पळून गेल्याची शक्यता घेऊन पोलीस टिम तिथे गेले होते, मात्र पोलीस पोहचण्यापूर्वीच तो गावातून पळून गेला होता. त्यामुळे त्याला या गुन्ह्यांत वॉण्टेड आरोपी घोषित करण्यात आले होते. गेल्या सतरा वर्षांपासून त्याचा पोलीस शोध घेत ाहेते. ही शोधमोहीम सुरु असताना फिरोज हा टिटवाळा येथील एका कन्स्ट्रक्शन साईटवर फिटरचे काम करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीची पोलिसांकडून चौकशी सुरु होती. फिटर म्हणून काम करणारा फिरोज असल्याचे तपासात उघडकीस आले होते.
या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त अभयसिंह देशखमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त सुदर्शन होनवडजकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लभडे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल महाजन, पोलीस हवालदार किरण चव्हाण, हेमंत शेडगे, राजेंद्र चौघुले, पोलीस शिपाई विवेक शिंपी, बळवंत करदोरे, सागर गावडे, मनेष सरकटे, विष्णू आव्हाड आदी पथकाने टिटवाळा येथून फिरोजला ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच इतर तिघांच्या मदतीने मसकूरची हत्या केल्याची कबुली दिली. फिरोज हा मूळचा बिहारच्या कटिहार, बारसोईचा रहिवाशी असून सध्या तो टिटवाळा येथील बनेली चौक, लक्ष्मण चाळीतील रुम क्रमांक दोनमध्ये राहत होता. हत्येनंतर तो मुंबईतून पळून गेला होता. वेगवेगळ्या ठिकाणी तो स्वतचे अस्तित्व बदलून राहत होता.
पोलीस त्याच्यापर्यंत पोहचू नये याची त्याने पुरेपुरे काळजी घेतली होती. तो काही दिवसानंतर त्याचे सिमकार्ड बदलत होता. सतरा वर्षांनंतर त्याला पोलीस पकडणार नाही याची खात्री पटली होती. त्यामुळे तो टिटवाळा येथे आला होता, एका कन्स्ट्रक्शन साईटवर त्याने फिटरचे काम सुरु केले होते. मात्र सतरा वर्षांनी त्याला हत्येच्या गुन्ह्यांत गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.