शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा घालणार्या त्रिकुटास अटक
देशभरातील ७९ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीच्या बहाण्याने जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून गंडा घालणार्या एका टोळीचा दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत एका मुख्य आरोपीसह त्याच्या दोन सहकार्यांना पोलिसांनी अटक केली. अमीत दिलीपराव काळे, रितिक शैलेश धारगावे आणि अनिरुद्ध सतीश उके अशी या तिघांची नावे असून ते तिघेही मूळचे नागपूरचे रहिवाशी आहेत. या कारवाईत पोलिसांनी अकरा वेगवेगळ्या बँक खात्याचे जप्त केलेले चेकबुक आणि पासबुक, पंचवीस विविध कंपन्याचे सिमकार्ड, अकरा बोगस कंपन्याचे रबर स्टॅम्प, तीन स्टॅम्प पॅड, डेबीट-क्रेडिट कार्ड, क्यूआर कोड, बोगस कंपन्यांचे दस्तावेज, पॅनकार्ड आदी मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींच्या अटकेने शेअर ट्रेडिंग गुंतवणुक घोटाळ्यातील देशभरातील ७९ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून त्यात मुंबईतील सहा गुन्ह्यांचा समावेश आहे. अटकेनंतर तिन्ही आरोपींना गिरगाव येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
रितेन कृष्णकांत झव्हेरी हे ज्वेलर्स व्यापारी असून ऑपेरा हाऊस येथे त्यांचा सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. जून महिन्यांत त्यांना सोशल मिडीयावर एका खाजगी कंपनीची जाहिरात दिसली होती. ही जाहिरात क्लिक केल्यानंतर त्यांना कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते. कंपनीचे सहाय्यक मिरा आयरसह इतर कर्मचार्यांनी त्यांना शेअर ट्रेडिंगची माहिती देताना त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना परताव्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून त्यांनी वेगवेगळ्या शेअरमध्ये ५८ लाख ७२ हजार ४१० रुपयांची गुंतवणुक केली होती.
या गुंतवणुकीवर त्यांना प्रचंड फायदा झाला होता. मात्र कंपनीने त्यांना गुंतवणुकीवर कुठलाही परताता तसेच मूळ रक्कम परत न करता फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मिरा आयरसह इतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सायरस इराणी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या पथकातील फातिमा बागवान, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास गोपाळ,पोलीस शिपाई गोरख पारेकर, मंगेश गायकवाड आदी पथकाने तपास सुरु केला होता.
तपासात फसवणुकीची रक्कमेपैकी २४ लाख ७५ हजाराची रक्कम नागपूर शहरातीलग्रेन गार्डन डिलाईट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाने सुरु केलेल्या बँक खात्यात जमा झाली होती. हाच धागा पकडून पोलीस पथक नागपूरला गेले होते. या पथकाने तांत्रिक माहितीवरुन अमीत काळे, रितिक धारगावे आणि अनिरुद्ध उके या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. तपासात या गुन्ह्यांत तिन्ही आरोपींचा सहभाग उघडकीस आला होता. यातील अमीत हा कटातील मुख्य आरोपी असून तो नागपूरच्या वाटोडा, चैत्येन्यश्वरनगरचा रहिवाशी आहे. त्याने रितिक आणि अनिरुद्धच्या मदतीने विविध बँक बोगस कंपन्यांच्या नावाने खाते उघडले होते. या सर्व बँक खात्यात वेगवेगळ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा झाली होती.
बोगस कंपनीच्या नावाने खाते उघडण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात बोगस दस्तावेज बनविले होते. या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली होती. त्यात फसवणुकीसाठी लागणारे बँकेचे धनादेश, पासबुक, डेबीट, के्रडीट कार्ड, सिमकार्ड, कंपन्यांचे बोगस रबर स्टॅम्प व इतर दस्तावेज जप्त केले. अटकेनंतर या तिघांना पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर मंगळवारी दुपारी तिन्ही आरोपींना गिरगाव येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.