गुप्तधनासह पाचपट सोने देण्याची बतावणी करुन ८३ लाखांची फसवणुक
गुन्हा दाखल होताच मुख्य आरोपीस अटक तर दोघांचा शोध सुरु
अरुण सावरटकर
८ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – गुप्तधनासह देवासमोर ठेवलेले सोने पाचपट करुन देतो असे सांगून सातजणांकडून विविध सोन्याचे दागिने आणि कॅश असा ८३ लाखांचा मुद्देमालाचा अपहार करुन पळून गेलेल्या एका मुख्य आरोपीस दिडोंशी पोलिसांनी अटक केली. उमेश अनंत देशपांडे असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांत विशाल अरुण गायकवाड आणि उर्वशी अरुण गायकवाड या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या तिघांनी संगनमत करुन त्यांच्या घरी गुप्तधन असून ते गुप्तधन दान करायचे आहे, तसेच देवापुढे दागिने आणि कॅश ठेवल्यास ते एका आठवड्यात पाचपट करुन देतो असे सांगून ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
पंकज विजय मंडल हे गोरेगाव येथील दिडोंशी, नागरी निवारा, संजीवन सोसायटीमध्ये राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. उमेश देशपांडे, विशाल गायकवाड आणि उर्वशी गायकवाड हे तिघेही त्यांच्याच सोसायटीमध्ये राहत असून ते चौघेही एकमेकांच्या परिचित आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते सोसायटीमध्ये दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करुन सोसायटीच्या सभासदांना जेवणाची पार्टी देत होते. त्यांनी स्वतला ते तिघेही स्वामी समर्थ महाराजाचे मोठे भक्त असल्याचे लोकांना दाखविण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येक वर्षी सत्यनारायणाची पूजा, पादुका पुजन, महिलांना ओटी भरण्याचे कार्यक्रम, हळदी कुंकू आदी कार्यक्रम घेऊन त्यांनी अनेकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नव्हे तर प्रत्येक कार्यक्रमांना ते महिलांना विशेष भेटवस्तू म्हणून चांदीचे दिवे, पैठणी साड्या, मोतीमणी आदी महागडे वस्तू देत होते.
ते तिघेही प्रचंड श्रीमंत व्यक्ती असून त्यांना कोणत्याही प्रकारची कधीच आर्थिक अडचण येत नाही असे दाखवून देण्याचा प्रयत्न करत होते. ऑगस्ट २०२६ रोजी उमेशने विशाल आणि उर्वशी गायकवाड यांच्या घरी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आणल्या होत्या. तिथे एक मोठा कार्यक्रम आयोजित करुन त्याने सोसायटीच्या सभासदांसाठी जेवणाची सोय केली होती. याच दरम्यान त्याने त्याच्या मामाने त्याला सहा किलो सोने, तेवीस किलो चांदी, एकशे वीस हिरे आदी मुद्देमाल दिला आहे. ते गुप्तधन असून त्यांना ते धन सर्वसामान्य लोकांना दान करायचे आहे असे सांगत होते. १६ सप्टेंबरला ते तिघेही पंकज मंडल याच्या घरी आले होते. त्यांनी रात्री उशिरा त्यांच्या स्वष्नांत स्वामी महाराज आले होते. त्यांना मामाच्या नावे मिळालेल्या गुप्तधनाबाबत पंकज हाच योग्य मार्ग दाखवेल असे सांगून त्याची तो तीन भागात विभागणी करणार आहे.
त्यातील एक भाग स्वामी महाराज, दुसरा भाग त्यांच्या आश्रम आणि तिसरा भाग एका जोडप्याला देणार आहे. त्यासाठी देवाने त्याचे नाव सुचवले आहे. त्याने पंकजला त्याच्याकडील असलेले सर्व स्त्रीधन एकत्र करण्यास सांगितले. ते स्त्रीधन त्याला पाचपट करुन देण्याचे आश्वासन दिले. उमेशसह विशाल आणि उर्वशीकडून त्याला त्यांच्याकडील गुप्त धन तसेच त्याच्याकडील स्त्रीधन पाच पट करुन मिळणार होते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना ७९ ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने दिले होते. ते सोने देवासमोर ठेवून त्याला एक आठवड्यात पाच पट सोने देतो असे सांगून ते तिघेही तेथून निघून गेले. याबाबत त्यांच्यात एक करार झाला होता. ३ ऑक्टोंबरला त्याने पंकजला घरी बोलावून त्याच्याकडे भरपूर सोने आणि शिवमुद्रा आहे, ते त्याला दान करायचे आहे, त्यासाठी त्याचा कोणी मित्र असेल तर सांग असे सांगितले. यावेळी त्याने त्याच्या सोन्याबाबत विचारणा केली असता त्याने काहीही उत्तर दिले नाही.
पाच दिवसांनी पंकज हा उमेश देशपांडे याच्या घरी गेला होता. यावेळी त्याला तिथे इतर सहाजण पाचपट सोने घेण्यासाठी आल्याचे दिसून आले. त्यात साहेबराव लकडून जाधव् मुकूंद रमाकांत कामत, अनिता अनंत मोरे, पूजा दिपक करगुटकर, आशि राणे आदींचा समावेश होता. पंकजसह इतर सहाजणांनी गुप्तधनासह पाचपट सोने मिळणार म्हणून उमेश देशपांडे, विशाल गायकवाड आणि उर्वशी गायकवाड यांना त्यांच्याकडील ७६ लाख रुपयांचे विविध सोन्याचे दागिने आणि सव्वासात लाखांची कॅश असा ८३ लाख २५ हजाराचा मुद्देमाल दिला होता. मात्र कोणालाही गुप्तधनासह पाचपट सोने न देता ते तिघेही पळून गेले होते.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच पंकज मंडलसह इतर सहाजणांनी दिडोंशी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती, घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगून त्यांनी तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर उमेश देशपांडे, विशाल गायकवाड आणि उर्वशी गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिडोंशी पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना या कटातील मुख्य आरोपी असलेलय उमेश देशपांडे याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन ही फसवणुक केल्याची कबुली दिली. याकामी त्यांना विशाल आणि उर्वशी गायकवाड यांनी मदत केली होती. ते दोघेही पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दरम्यान अटकेनंतर उमेश देशपांडेला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.