पत्नीच्या सल्ल्यानंतर वयोवृद्ध महिलेच्या घरातील चोरीचा पर्दाफाश

आरोपी केअरटेकर पतीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – घरी जातो असे सांगून घरी न आलेला पती पळून गेल्याचे लक्षात पत्नीच्या सल्ल्यानंतर सायन येथील एका वयोवृद्ध महिलेच्या घरातील साडेसहा लाखांचा चोरीचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी पळून गेलेल्या आरोपी केअरटेकर किसन सखाराम कदम याच्याविरुद्ध सायन पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. किसनच्या पत्नीने तक्रारदार वयोवृद्ध महिलेला चोरीचा संशय व्यक्त करुन तिच्या घरातील दागिने आणि कॅशची पाहणी करण्याचा सल्ला दिला होता, तिने कपाटातील दागिने आणि कॅशची पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

७० वर्षांची शुभांगी मोहन मठकर ही वयोवृद्घ महिला तिच्या कुटुंबियांसोबत सायन येथील जैन सोसायटीमध्ये राहते. तिचा मुलगा आणि सून एका खाजगी कंपनीत कामाला आहे तर तिचे पती मंत्रालयातून व ती स्वत एका खाजगी बँकेतून निवृत झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून तिचे पती मोहन मठकर हे आजारी असल्याने त्यांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी किसन कदम याला केअरटेकर म्हणून कामाला ठेवले होते. नोव्हेंबर २०२५ पासून तो त्यांच्याकडे कामावर होता. रात्री नऊ ते सकाळी नऊ असा त्याच्या कामाची वेळ होती. मे २०२६ रोजी मोहन यांना ब्रेन स्टोक आल्याने त्यांच्यासाठी २४ तास केअरटेकरची गरज होती. त्यामुळे त्यांनी किसनला त्यांच्या घरी केअरटेकर म्हणून काम करण्याची विनंती केली होती. त्याला पैशांची गरज होती, त्यामुळे त्याने त्यांच्याकडे २४ तास काम करण्याची तयारी दर्शविली होती.

या कालावधीत त्याने संपूर्ण कुटुंबियांचा विश्‍वास संपादन केला होता. त्यामुळे तो त्यांच्या घरातील एक सदस्य म्हणून राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो पगार घेतल्यानंतर त्याच्या घरी जात होता. एक-दोन दिवसाची सुट्टी सांगून तो बरेच दिवस तिथेच राहत होता. अनेकदा तो कॉल घेत नव्हता. गेल्या महिन्यांत तो घरी जातो असे सांगून गेला आणि परत आला नाही. कॉल केल्यानंतर तो प्रतिसाद देत नव्हता. त्याच्या पत्नीला कॉल केल्यानंतर तिने तो घरी आलाच नाही असे सांगितले. यावेळी तिने त्याला काही पैसे दिले आहे का, त्यांच्या घरातील दागिने तपासा असा सल्ला दिला होता. त्यामुळे शुभांगी मठकर हिने कपाटातील दागिने आणि कॅशची पाहणी केली असता तिला विविध सोन्याचे दागिने आणि वीस हजाराची कॅश असा सुमारे साडेदहा लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले.

नोव्हेंबर २०२५ ते ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत किसनने त्यांच्या घरी काम करताना टप्याटप्याने सोन्याच्या दागिन्यांसह कॅशवर हातसफाई केली होती. हा प्रकार उघडकीस येताच शुभांगी मठकर हिने सायन पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर किसन कदम याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page