विश्‍वासाने दिलेल्या मर्सिडिझ बेंझ कारचा अपहार करुन फसवणुक

३५ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी एका कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३१ मे २०२४
मुंबई, – विश्‍वासाने दिलेल्या मर्सिडिज बेंझ कारचा अपहार करुन एका मेकअप आर्टिस्ट महिलेची सुमारे ३५ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फाहीद कादरी, फरहाद कादरी, मेहमूद कादरी मेहजीन कादरी अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांनी कार पार्किंगच्या नावाने कार घेऊन कारची परस्पर खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

रेहाब झोएब सय्यद ही महिला वांद्रे येथे राहत असून तिचे पती झोएब सय्यद हे एका खाजगी बँकेत आयटी मॅनेजर आहे तर ती स्वतचा मेकअप आर्टिस्ट आहे. तीन वर्षांपूर्वी तिने वैयक्तिक वापरासाठी एक मर्सिडिझ बेंझ कार खरेदी केली होती. या कारसाठी तिने ३५ लाखांचे पेमेंट केले तर दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ४५ लाखांचे पेमेंट केल्यांनतर फाहीदच्या मध्यस्थीने तिने ती कार राकेश पाटील यांच्याकडून घेतली होती. याकामी तिने फाहीदला काही कमिशन दिले होते. या कारचे मासिक हप्ते ती भरत आहे. डिसेंबर २०२२ ती तिच्या कुटुंबियांसोबत सौदी अरेबिया येथे जाणार होती. ही माहिती फाहिदला माहित होती, कार पार्किंगमुळे अडचण होणार असल्याने फाहिदने ती कार त्याच्याकडे ठेवण्यास सांगितली. त्याच्यावर विश्‍वास ठेवून तिने ती कार त्याच्याकडे सोपविली होती. जानेवारी २०२३ रोजी सय्यद कुटुंबिय मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या कारची मागणी केली असता मेहजबीनने ती कार तिचे पती आणि सासरे घेऊन गेल्याचे सांगितले. त्यामुळे तिने त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. एक आठवड्यानंतर तिला फाहीदने एका कार्यक्रमासाठी कार दिल्याचे सांगून दहा-पंधरा दिवसांत कार आणून देतो असे सांगितले. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने कार परत केली नाही. काही दिवसांनी तिला रोहित चौधरी या व्यक्तीने ती कार चोरीस गेल्याची तक्रार बांगुरनगर पोलिसांत केली होती. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्घ पोलिसांनी कार चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

चौकशीदरम्यान फाहीदने सुरेश टेकचंदानी याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते पैसे देता येत नसल्याने ती कार त्याने सुरेशला सिक्युरिटीसाठी जमा केली होती. याच दरम्यान कादरी कुटुंबियांनी ती कार विक्री करुन एका महिन्यांत त्यांना ३५ लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर त्यांच्यात कार खरेदी-विक्रीबाबत एक करार झाला होता. या करारादरम्यान फाहीदने तिला ३५ लाखांचा एक धनादेश दिला होता. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी कारचे पैसे दिले नाही. त्यांनी दिलेला धनादेश बँकेत न वटता परत आला होता. याबाबत विचारणा केल्यानंतर कादरी कुटुंबियांनी तिला आता त्याच्याकडे पैसे नाही आहेत, जेव्हा पैसे येतील तेव्हा पेमेंट करु. पोलिसांत तक्रार केल्यास तिच्यासह कुटुंबियांना गंभीर परिणाम परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. अशा प्रकारे विश्‍वासाने दिलेल्या कारचा कादरी कुटुंबियांनी कट रचून अपहार करुन कारची परस्पर विक्री करुन तिची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तिने त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी फाहीद कादरी, फरहाद कादरी, मेहमूद कादरी मेहजीन कादरी यांच्याविरुद्ध ४०६,२०, ५०४, ५०६, १२० ब भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या चौघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौघांनी या कारची कोणाला विक्री केली, कार खरेदी-विक्रीचा व्यवहार किती रुपयांमध्ये झाला. त्यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का, त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page