इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीच्या नावाने फसवणुक

६ कोटी ७२ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – पवईतील एका पुर्नविकास इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून एका वयोवृद्ध व्यावसायिकाची एकाच कुटुंबातील चारजणांच्या टोळीने ६ कोटी ७२ लाख रुपयांची फसवणुक केली. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फ्लॅटची परस्पर विक्री करुन मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम न देता फसवणुक केल्याप्रकरणी या चारही आरोपीविरुद्ध पवई पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हरेश हिराणी, सुरेश हिराणी, संदीप हिराणी आणि शमीक हिराणी अशी या चौघांची नावे असून ते चौघेही शमीक इंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे संचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

६६ वर्षांचे वयोवृद्ध सुनिल कृष्णाप्रकाश हे व्यावसायिक असून पवईतील हिरानंदानी बिझनेस पार्कमधील एका पॉश अपार्टमेंटमध्ये राहतात. अकरा वर्षांपूर्वी त्यांची आरोपींशी ओळख झाली होती. या ओळखीत त्यांनी ते एका बांधकाम क्षेत्राशी संबंधित कंपनीचे संचालक असल्याचे सांगितले होते. त्यांच्या कंपनीला निरामया सहकारी सोसायटी इमारतीच्या पुर्नविकासाचे काम मिळाले होते. या पुर्नविकास इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला परवाता देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यांना पार्टनरशीपची ऑफर देण्यात आली होती. ही ऑफर चांगली वाटल्याने त्यांनी त्यांच्यासोबत पार्टनरशीपमध्ये गुंतवणुक करण्याची तयारी दर्शविली होती. त्यांच्यात झालेल्या करारानंतर त्यांनी त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यात फेब्रुवारी २०१३ ते एप्रिल २०२३ या कालावधीत टप्याटप्याने ६ कोटी ७२ लाख ५० हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. गेल्या वर्षी इमारतीचा प्रोजेक्ट पूर्ण झाला होता. त्यानंतर शमीक इंटरप्रायझेज लिमिटेडच्या चारही संचालकांनी इमारतीच्या काही फ्लॅटची परस्पर विक्री केली होती. फ्लॅट विक्रीतून आलेली रक्कम कंपनीच्या बँक खात्याऐवजी दुसर्‍या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती.

अशा प्रकारे या चौघांनी त्यांना मूळ रक्कमेसह परवाव्याची रक्कम न देता त्यांची फसवणुक केली होती. याबाबत वारंवार विचारणा करुनही त्यांच्याकडून त्यांना काही प्रतिसाद मिळत नव्हता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पवई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शमीक इंटरप्रायझेज लिमिटेड कंपनीच्या चारही संचालक हरेश हिराणी, सुरेश हिराणी, संदीप हिराणी आणि शमीक हिराणी यांच्याविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत लवकरच या चौघांची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page