अश्‍लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देऊन खंडणीची मागणी

अंधेरीतील घटना; तरुणीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सोशल मिडीयावर अश्‍लील व्हिडीओ व्हायरची धमकी देऊन एका २४ वर्षांच्या तरुणीकडे अज्ञात व्यक्तीने खंडणीची मागणी केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या तरुणीच्या तक्रारीवरुन या व्यक्तीविरुद्ध आंबोली पोलिसांनी विनयभंगासह खंडणीसाठी धमकी देणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोशल मिडीयावर ओळख झालेल्या अज्ञात तरुणाशी व्हिडीओ कॉलवर संभाषण करणे या तरुणीला चांगलेच महागात पडले आहे.

तक्रारदार तरुणी ही अंधेरीतील आझादनगर परिसरात राहत असून ती एका खाजगी कंपनीत कामाला आहे. ऑगस्ट महिन्यांत तिची सोशल मिडीयावर दक्ष बजाज आणि रोहित नाव सांगणार्‍या एका अज्ञात व्यक्तीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. याच दरम्यान या दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. त्यानंतर ते स्पॅनचॅट, इंटाग्राम, व्हॉटअप या सोशल मिडीयासह मोबाईलवरुन एकमेकांच्या संपर्कात होते. अनेकदा दक्ष हा तिच्या व्हिडीओ कॉलवर संभाषण करत होता. संभाषणादरम्यान तो तिला त्याचे तिच्यावर खूप प्रेम असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. व्हिडीओ कॉल सुरु असताना त्याने तिला कपडे काढून न्यूड होण्यास प्रवृत्त करुन तिचे काही अश्‍लील व्हिडीओ बनविले होते. त्यानंतर त्याने तिच्या नावाने बोगस आयडी तयार करुन तिला मॅसेज सुरु केले होते. त्यात तो तिच्याकडे सतत पैशांची मागणी करत होता. पैसे दिले नाहीतर तिचे अश्‍लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत होता.

या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. दक्ष ऊर्फ रोहितकडून फसवणुकीसह खंडणीसाठी येणार्‍या धमकीनंतर तिने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिने शनिवारी १९ ऑक्टोंबरला आंबोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दक्ष ऊर्फ रोहितविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आंबोली पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध ७८, ७९, ३०८ (२), ३५१ (२), ३५२ भारतीय न्याय सहिता सहकलम ६७ (अ) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page