मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – वेबसिरीज, ओटीटी प्लेटफॉर्म आणि चित्रपटात भूमिका तसेच नोकरीच्या आमिषाने सुरु असलेल्या एका सेक्स रॅकेटचा कुरार पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी हैद्राबादच्या एका आरोपीस महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर तीन ते चारजणांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. एका पिडीत मुलीने स्वतची सुटका करुन घडलेला प्रकार कुरार पोलिसांना सांगितला. त्यानंतर या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले.
१८ वर्षांची पिडीत तरुणी ही तिच्या वयोवृद्ध आई, सहा भाऊ आणि बहिणीसोबत मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात राहते. जून महिन्यांत तिच्या आईची मैत्रिण सुनिता रणाखांबे ही तिच्या घरी आली होती. सुनिता ही टिटवाळा, रेश्माई विद्या मंदिरासमोरील विराट हॅरिटाईज अपार्टमेंटमध्ये राहत होती. तिने तिला नोकरीचे आमिष दाखवून दरमाह २० हजार रुपये पगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे ती तिच्यासोबत नोकरीसाठी टिटवाळा येथे गेली होती. तिच्या घरी गेल्यानंतर तिने तिची एका तरुणीसोबत ओळख करुन दिली. ही तरुणी तिने तिची मुलगी असल्याचे सांगितले होते. याच घरात तिच्या मुलीचा पती आणि तीन मुलेही राहत होते. दुसर्या दिवशी ते दोघेही तिला कामानिमित्त एका हॉटेलमध्ये घेऊन आले. तिथे तिने तिची ओळख समीर नाव सांगणार्या एका व्यक्तीशी करुन दिली होती. समीरने त्याच्या बाईकवरुन तिला कर्जत येथील नेरुळ रोड, डिमार्टजवळील इको ग्रीन इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये आणले. तिथे त्याने तिची ओळख आमीर या तरुणासोबत करुन दिली. त्यानंतर या दोघांनी तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले होते. ते प्यायल्यानंतर तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली.
दुसर्या दिवशी तिला जाग आल्यानंतर तिला तिच्या अंगावर काहीच कपडे नसल्याचे दिसून आले. त्यामुळे ती प्रचंड घाबरली आणि तिने कपडे घातले होते. यावेळी तिला गुप्त भागावर प्रचंड वेदना होत होत्या. याबाबत तिने समीरकडे विचारणा केल्यानंतर त्याने तिला एक व्हिडीओ दाखविला होता. त्यात तिच्यासोबत आमीर हा लैगिंक अत्याचार करत असल्याचे दिसून आला. याबाबत तिने कोणालाही काहीही सांगितले तर तिचा अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी त्याने तिला दिली होती. दुसर्या दिवशी त्याने तिला पुन्हा सुनिताच्या घरी आणून सोडले. हा प्रकार तिने सुनिताच्या मुलीला सांगितला. यावेळी तिने तिची समजूत काढताना आमीर बोलत आहे तसे कर. नाहीतर ते तिचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करतील असे सांगितले. त्यानंतर ती त्यांच्यासोबत राहू लागली. जुलै महिन्यांत समीरने तिला बेलापूर, गोवा आणि नंतर कर्जत येथे आणले. तिथे त्याने तिला जबदस्तीने बिअर पिण्यास प्रवृत्त केले होते. त्यानंतर त्याने तिच्याशी अनेकदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. तिथे काही दिवस राहिल्यानंतर समीरने तिला पुन्हा टिटवाळा येथे आणले.
अशा प्रकारे सुनितासह आमीर आणि समीर यांनी तिला चित्रपटात भूमिका देतो तसेच चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून टिटवाळा येथे आणून नंतर कर्जत, गोवा, हैद्राबाद आणि बेलापूर येथे ठेवून तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला. तिचे अश्लील व्हिडीओ बनवून तिने त्यांच्याविरुद्ध तक्रार केली किंवा कोणालाही काहीही सांगितले तर तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. ५ ऑक्टोंबरला ती तेथून पळून तिच्या मालाड येथील घरी आली. यावेळी तिने घडलेला प्रकार तिच्या भावाला सांगितला. ही माहिती ऐकून त्याला मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी कुरार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित सर्व आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी १४३ (२), ६४ (२), (डी), ३ (५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना हैद्राबाद येथून एका महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत तिचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. प्राथमिक तपासात ही टोळी अनेक तरुणींना वेबसिरीज, ओटीटी आणि चित्रपटांत काम देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले. या तरुणींचे अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करुन त्यांना सेक्स रॅकेटमध्ये आणले जात होते.