घातक शस्त्रे घेऊन आलेल्या पाचजणांच्या टोळीस अटक
पायधुनीतील हॉटेलमध्ये खंडणीविरोधी पथकाची कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2026
मुंबई, – घातक शस्त्रे घेऊन आलेल्या पाचजणांच्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. पायधुनीतील एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत पोलिसांनी तीन देशी बनावटीचे पिस्तूल, तीन मॅगझीन, पाच मोबाईल आणि एकवीस जिवंत काडतुसांचा साठा जप्त केला आहे. सुरेंद्र अमरलालजी मिना, रोहित धनश्याम मिना, कार्तिक विरेंद्र पारचा, दिपककुमार छितरलाल बिल आणि रोनूरौनक पन्नालाल मैराठा अशी या पाचजणांची नावे असून यातील कार्तिक हा हरियाणा तर इतर चारही आरोपी राजस्थानचे रहिवाशी आहे. त्यांच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्यांना किल्ला कोर्टाने 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रांची विक्री होत असल्याने अशा शस्त्रे विक्री करणार्या आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना पायधुनीतील अॅलिगंट हॉटैलमध्ये काही तरुण राहत असून त्यांच्या मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रसाठा असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी शनिवारी सायंकाळी या पथकाने नारायण ध्रुव मार्गावरील अॅलिगंट हॉटेलच्या तिसर्या मजल्यावरील रुम क्रमांक 305 मध्ये छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुरेंद्र मिना, रोहित मीना, कार्तिक पारचा, दिपककुमार बिल आणि रौनूरौनक मैराठा या पाचजणांना ताब्यात घेतले होते.
रुमसह त्याच्या सामानाची झडती घेतल्यानंतर तिथे पोलिसांना तीन देशी बनावटीचे पिस्तूल, एकवीस जिवंत काडतुसे, तीन मॅगझीन आणि पाच मोबाईल सापडले. तपासात ते सर्वजण राजस्थान आणि हरियाणाचे रहिवाशी असल्याचे उघडकीस आल होते. काही दिवसांपूर्वीच ते राजस्थानातून मुंबईत घातक शस्त्रांची विक्रीसाठी आले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर रविवारी दुपारी त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना बुधवार 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांना ते शस्त्रे कोणी दिले, ते शस्त्रे कोणाला देणार होते, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्यांनी यापूर्वीही घातक शस्त्रांची विक्री केली आहे का, जप्त केलेल्या घातक शस्त्रांचा इतर कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला का किंवा होणार होता का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल पवार, अरुण थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते, रुपेश पाटील व इतर पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी केली.