वर्षा बंगल्यावर आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला

सोलापूरच्या 39 वर्षांच्या व्यक्तीला अटकेनंतर नोटीसवर सोडले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
29 मे 2025
मुंबई, – मलबार हिल येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर आत्मदहनाचा प्रयत्न तिथे उपस्थित पोलिसांनी हाणून पाडला. याप्रकरणी अजीत रामकृष्ण मैंदगी या 39 वर्षांच्या व्यक्तीविरुद्ध मलबार हिल पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती. अजीत हा मूळचा सोलापूरचा रहिवाशी असून अटकेनंतर त्याला 35 (3) नोटीस देऊन सोडून देण्यात आले. त्याच्याकडून पोलिसांनी एक बाटलीतून आणलेले पेट्रोल आणि लायटर हस्तगत केले आहेत. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अजीत मैंदगी हा मूळचा सोलापूरच्या बालीवेस, उत्तर कसबाचा रहिवाशी आहे. दोन दिवसांपूर्वी तो त्याच्या विविध मागण्यासाठी मुंबईत आला होता. वर्षा बंगल्यावर तो आत्मदहनाचा प्रयत्न करणार असल्याची माहिती चावडी पोलिसांकडून मलबार हिल पोलिसांना देण्यात आली होती. त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन शॅडो वॉचर्स ठेवण्यात आले होते. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता तो वर्षा बंगल्याजवळ आला होता. त्याच्या हातात एक बाटली होती, त्यात त्याने पेट्रोल आणले होते.

बंगल्याजवळ येताच त्याने आत्मदहनाचा प्रयत्न करण्यापूर्वीच त्याला तिथे उपस्थित पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला मलबार हिल पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याच्याकडे पोलिसांना शंभर मिलीलिटर पेट्रोल आणि एक लायटर सापडले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला कायदेशीर अटक दाखवून नंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी वेळीच अजीत मैंदगीला ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page