पत्नीवर हल्ला करुन पळून गेलेल्या पतीला अटक व कोठडी
किचनमधील पिशवी उचलण्यास सांगितली म्हणून केला हल्ला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 एप्रिल 2026
मुंबई, – पत्नीला लाथ्याबुक्यासह मिक्सरच्या भांड्याने डोक्यात प्राणघातक हल्ला करुन पळून गेलेल्या आरोपी पतीला अखेर एक आठवड्यानंतर चारकोप पोलिसांनी अटक केली. विकास चतुरसेन पहावा असे या 52 वर्षीय आरोपी पतीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. किचनमधील पडलेली पिशवी उचलण्यास सांगितले म्हणून विकासने त्याची पत्नी पायल विकास पहावा हिच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. हल्ल्यानंतर तो पळून गेला होता, अखेर त्याला बुधवारी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही घटना गुरुवार 30 एप्रिलला सकाळी नऊ वाजता कांदिवलीतील चारकोप, सेक्ट क्रमांक नऊ, चारकोप साईबाबा सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीच्या रुम क्रमांक बी/903 मध्ये 49 वर्षांची तक्रारदार महिला पायल ही तिच्या पती विकास, मुलगा युगम, सासू पुष्पा आणि सासरे चतुरसेन यांच्यासोबत राहते. ती अंधेरीतील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. 30 एप्रिलला ती तिच्या सासू आणि सासर्यासोबत घरी होती. यावेळी किचनजवळ एक पिशवी पडली होती. त्यामुळे किचनमध्ये गेलेल्या विकासला तिने पिशवी उचला असे सांगितले. त्याचा त्याला प्रचंड राग आला आणि रागाच्या भरात त्याने तिला अशी काम त्याला मला सांगायची नाही. तिला शिवीगाळ करुन तो तिच्या अंगावर धावून गेला. तिला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली. तिने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याने तिला मारहाण सुरुच ठेवली होती.
काही वेळानंतर त्याने किचनमधील मिक्सरच्या भाड्याने तिच्या डोक्यावर मारले. त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यावेळी सासू-सासर्याने तिला मारहाण करु नकोस असे सांगूनही तो तिला मारहाण करत होता. त्यामुळे ती प्रचंड घाबरली आणि रुममध्ये पळून गेली. आतून कडी लावल्यानंतर आरोपी पती विकास पहावा तेथून पळून गेला होता. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने पायलला नंतर तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिच्या डोक्याला आठ टाके लागले होते. या घटनेनंतर ती तिच्या नातेवाईकांसोबत चारकोप पोलीस ठाण्यात आली आणि तिने तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पती विकास पहावा याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्याचा शोध सुरु असताना त्याला बुधवारी 6 मेला पोलिसांनी कांदिवली परिसरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पिशवी उचलण्यास सांगितले म्हणून आरोपी पतीने त्याच्याच पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.