मुलाने टेम्पोची धडक दिल्याने 46 वर्षांच्या पित्याचा मृत्यू

पित्याच्या अपघाती मृत्यूप्रकरणी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 एप्रिल 2026
मुंबई, – टेम्पो पुढे-मागे घेताना अचानक एक्सीलेटरवर पाय दाबला गेल्याने मुलाने मार्गदर्शन करणार्‍या पित्याला जोरात धडक दिली. या विचित्र अपघातात रामदीन सुंदर यादव या 46 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. स्वतच्या पित्याच्या अपघाती मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपी मुलगा शुभम रामदीन यादव याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने यादव कुटुंबियांवर प्रचंड शोककळा पसरली होती. हा अपघात बुधवारी सायंकाळी चार वाजता अंधेरीतील मरोळ, मकवाना रोड, बीएमसी पे अ‍ॅण्ड पार्कच्या बेसमेंटच्या वसंत ओवेसिसमध्ये घडली.

हेमकांत जयवंत किणी हे अंधेरी येथे राहत असून सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी दुपारी ते त्यांचे सहकारी सहाय्यक फौजदार हणमंत बाबर, पोलीस हवालदार वाल्हेकर, महिला पोलीस शिपाई ननवरे यांच्यासोबत परिसरात गस्त घालत होते. यावेळी वसंत ओवेसिस मरोळ पार्किंगजवळ अपघात झाल्याची माहिती पश्चिम कंट्रोल रुममधून पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना एका व्यक्तीला सहा चाकी टाटा कंपनीच्या आशयर टेम्पोने धडक दिल्याचे दिसून आले. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. तो बेशुद्धावस्थेत होता, त्याच्या शेजारीच एक तरुण बसला होता.

चौकशीअंती त्याचे नावे शुभम यादव तसेच जखमी व्यक्ती त्याचे वडिल रामदीन यादव असल्याचे समजले. यावेळी जखमी व्यक्तीला पोलिसांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अपघाताबाबत शुभमची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने तो त्याचे वडिल रामदीनसोबत विलेपार्ले येथील सहार कार्गो येथून टेम्पोतून माल भरुन बीएमसी पार्किंगमध्ये आले होते. पार्किंगच्या आत गेल्यानंतर टेम्पो पार्क करण्याासाठी रामदीन त्याला पुढे-मागे टेम्पो घेण्याबाबत मार्गदर्शन करत होते. यावेळी टेम्पो चालविताना त्याचा पाय एक्सीलेटरवर गेला आणि त्याने त्याच्या वडिलांना जोरात धडक दिली होती. तिथे टेम्पो बंद पडल्याने त्याने त्याच्या वडिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला यश आले नाही.

वडिलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो तिथे जोरजोरात आवाज देऊन मदतीसाठी बोलाविण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तिथे कोणीही आले नाही. पोलीस आल्यानंतर त्याच्या वडिलांना कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या जबानीनंतर हेमकांत किणी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शुभम यादव याच्याविरुद्ध टेम्पो हलगर्जीपणाने चालवून स्वतच्या वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. टेम्पोच्या धडकेने वडिलांचा मृत्यू झाल्याने त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page