फसवणुकीची रक्कम सायबर ठगांना देणार्या तीनजणांच्या टोळीस अटक
दया नायकच्या नावाने नावाने वयोवृद्धेला घातला 91 लाखांना गंडा
अरुण सावरटकर
7 एप्रिल 2026
मुंबई, – गावातील बेरोजगार तरुणांना मुंबईत आणून त्यांच्या कागदपत्रांवरुन वेगवेगळ्या बँकेत खाती उघडून सायबर गुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कम सायबर ठगांना पुरविणार्या एका टोळीचा उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नायब खान, वीर राजपूतआणि यश बंशी अशी या तिघांची नावे आहेत. बँकेत खाती उघडणार्या तरुणांना पाच हजार रुपये कमिशन देण्यात आले होते, विशेष म्हणजे खाते उघडताना अर्जाची बँक अधिकार्यांकडून कुठलीही शहानिशा करण्यात आली नव्हती, त्यामुळे या गुन्ह्यांत काही बँक अधिकार्यांचा सहभाग उघडकीस आला आहे. या खातेदरासह बँक अधिकार्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अटकेनंतर तिन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
रक्षा दिलीप मेहता ही 63 वर्षांची वयोवृद्ध महिला दहिसर येथे राहत असून एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाली आहे. 18 फेब्रुवारीला तिला अजय पाटील या व्यक्तीचा कॉल आला होता. त्याने तो कर्नाटकच्या बंगलोर, इंदिरानगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले होते. एका ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून सदाफत खान या व्यक्तीला अटक केली होती. त्याच्याकडे पोलिसांना अनेक आधारकार्ड, पॅनकार्ड आणि डेबीट कार्ड सापडले होते. त्यात तिच्या बँकेचा डेबीट कार्डचा समावेश होता. तिच्या नावाने उघडण्यात आलेल्या बँक खात्यात तीन कोटीचा व्यवहार झाला होता. त्यात तिला 75 लाख रुपये कमिशन म्हणून प्राप्त झाल्याचे पुरावे असल्याचे सांगितले. जवळपास तो तिच्याशी तीस मिनिटे व्हिडीओ कॉलवरुन बोलत होता. त्याने पोलीस गणवेश घातला होता, त्यामुळे तिला तो खरोखरच पोलीस वाटला होता. याच दरम्यान त्याने तिची वैयक्तिक माहिती काढून बँकेशी संबंधित तसेच इतर गुंतवणुकीबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
काही दिवसांनी तिला दया नायक नाव सांगणार्या पोलीस अधिकार्याने कॉल केला होता. त्याने तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तिने तपासात सहकार्य करावे. नाहीतर तिच्यावर अटकेची कारवाईची धमकी दिली होती. यावेळी तिने तिचा या संपूर्ण प्रकरणात काहीही संबंध नसल्याचे सांगून त्याने तिचे ऐकले नाही. त्याने तिच्यावर पोलिसांची नजर असून त्यांचे पोलीस तिच्या घराजवळ पाळत ठेवून तिला डिजीटल अरेस्ट केल्याचे सांगितले होते. याच दरम्यान त्याने तिला व्हॉटअपवर विविध पोलीस यंत्रणेसह स्टेट बँकेचे लोगो असलेले पत्र पाठविले होते. तिच्या बँक खात्यासह गुंतवणुकीची रक्कम एकत्र करुन त्यांनी दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात आले होते. चौकशी पूर्ण होईपर्यंत ही रक्कम सुरक्षित असेल, त्यात ती निर्दोष असल्यास तिला तिची रक्कम परत केली जाईल असे सांगितले. त्यामुळे तिने तिच्या बँकेची एफडी तोडून 81 लाख रुपये आणि तिच्या सेव्हिंगची दहा लाख असे 91 लाख रुपये जमा केले होते.
ही रक्कम तिने आरटीजीएसद्वारे संबंधित बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. बँकेत कोणी पैशांविषयी विचारणा केली तर ती रक्कम फ्लॅट खरेदीसाठी देत असल्याचे सांगण्यास सांगण्यात आले होते. ही रक्कम आरके कन्स्ट्रक्शन आणि चिराग खोकर यांच्या बॅक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. काही दिवसांनी तिची मुलगी घरी आली होती, यावेळी तिने घडलेला प्रकार तिला सांगितला. तिच्याकडून ही माहित समजताच तिला धक्काच बसला होता. तिची अज्ञात सायबर ठगाकडून फसवणुक झाल्याचे मुलीकडून समजताच तिने तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने सायबर हेल्पलाईनसह उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी नायब खान, वीर राजपूत आणि यश बंशी या तिघांना ताब्यात घेतले होते.
चौकशीत या गुन्ह्यांचा त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. ते तिघेही गुन्ह्यांतील मुख्य सायबर ठगांच्या संपर्कात होते. त्यांच्याच सांगण्यावरुन त्यांनी त्यांच्या गावच्या काही तरुणांना मुंबईत आणले होते. त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात खाते उघडण्यास सांगितले होते. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा झाली होती. ती रक्कम बँकेतून काढून या तिघांनी सायबर ठगांना दिली होती. याकामी बँकेत खाती उघडणार्या तरुणांना प्रत्येकी पाच हजार रुपये कमिशन म्हणून देण्यात आले होते. या गुन्ह्यांत काही बँक अधिकार्यांचा सहभाग उघडकीस आला आहे. या बँक अधिकार्यांनी कुठलीही शहानिशा न करता संबंधित आरोपीचे बँकेत खाते उघडून देण्यास मदत केली होती. या गुन्ह्यांत सात ते आठ आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.