गर्दीत बेस्टमध्ये मोबाईल चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

चोरीच्या १२ लाख ६७ हजाराच्या १३४ मोबाईलसह सातजणांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ ऑगस्ट २०२६
मुंबई, – गर्दीचा फायदा घेऊन बेस्ट बसमध्ये मोबाईल चोरी करणार्‍य एका रेकॉर्डवरील सराईत टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत सात आरोपींना पोलिसांनी अटक केली. अझर मुकीम मिर्झा बेग, दिलशाद अहमदअली बेग, वसीम सलीम शेख, फिरोज ऊर्फ जाहिद तव्हार हुसैन खान, मुबीन ऊर्फ एम. के जहरीला बाबू रझा खान, आबिदअली अजगरअली शेख आणि सुशीलकुमार छत्रधारी सिंह ऊर्फ ठाकूर अशी या सातजणांची नावे असून ते सर्वजण मुंब्रा आणि शिवाजीनगरचे रहिवाशी आहेत. आरोपींकडून पोलिसांनी चोरीचे १३४ मोबाईल जप्त केले असून त्याची किंमत १२ लाख ६७ हजार ५०० रुपये इतकी आहे. त्यांच्या अटकेने एमआयडीसी, अंधेरी पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर सातही आरोपींना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

६ जून २०२६ रोजी जगत ज्योती मोहांती हे ५९ वर्षांचे तक्रारदार सिप्झ बसस्टॉप येथून अंधेरी रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणार्‍या ४१५ क्रमांकाच्या बेस्ट बसने प्रवास करत होते. यावेळी बसमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने त्यांचा ९० हजाराचा महागडा मोबाईल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध मोबाईल चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही वर्षांत बेस्ट बसमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीच्या चोरीच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे या तक्रारीची अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी गंभीर दखल घेत एमआयडीसी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनश्याम नायर, पोलीस निरीक्षक सुनिल करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, पोलीस हवालदार नितीन नलावडे, पिसाळ, पोलीस शिपाई प्रविण जाधव, स्वप्निल तेली, शीतल माळी, सुरज जगताप आदी पथकाने तपास सुरु केला होता. सिप्झ बसस्टॉप ते अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यानचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही फुटेजमध्ये संबंधित आरोपी संशयास्पद फिरताना दिसून आले होते. त्यानंतर या पथकज्ञाने आरोपींचा शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना अझर बेग आणि दिलशाद बेग या दोघांनाही २० जुलैला पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत गर्दीच्या वेळेस बेस्ट बसमध्ये मोबाईल चोरी करणारी ही रेकॉर्डवरील गुन्हेगार टोळी असल्याचे उघडकीस आले. यावेळी त्यांच्या इतर काही सहकार्‍यांची नावे समोर आली होती. त्यामुळे त्यांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ३० जुलैला पळून गेलेल्या वसीम शेख, फिरोज खान, मुबीन खान, आबिदअली शेख आणि सुशीलकुमार सिंह या पाचजणांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी १३४ चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहे. त्याची किंमत १२ लाख ६७ हजार ५०० रुपये इतकी आहे.

ही टोळी गर्दीचा फायदा घेऊन बेस्ट बसमध्ये चोरी करुन पलायन करत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्या अटकेने अंधेरी पोलीस ठाण्यात एक आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या दोन अशा तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन बेस्टमध्ये चोरी करणार्‍या सात आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीचे १३४ मोबाईल हस्तगत करणार्‍या वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनश्याम नायर व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, पोलीस हवालदार नितीन नलावडे, पोलीस शिपाई प्रविण जाधव, स्वप्निल तेली, शीतल माळी, सुरज जगताप यांचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page