सुरक्षारक्षकाची अज्ञात मारेकर्याकडून गळा आवळून हत्या
मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ ऑगस्ट २०२६
मुंबई, – विलेपार्ले येथील एका निवासी इमारतीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्या मनोजकुमार अयोध्या यादव याची अज्ञात व्यक्तीने गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीत टाकून मारेकर्यांनी हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. सकाळी उघडकीस आलेल्या या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. या हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. याप्रकरणी जुहू पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या मारेकर्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांचा जुहू पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
ही घटना शनिवारी बारा ते रविवारी पहाटे पाचच्या दरम्यान विलेपार्ले येथील व्ही. एम रोड, अभिजीत इमारतीमध्ये घडली. याच इमारतीमध्ये ३५ वर्षांचा मनेाजकुमार हा गेल्या सहा महिन्यांपासून सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. इमारतीच्या वरच्या मजल्यावर काही रहिवाशी राहत असून इतर मजल्यावर खाजगी कार्यालये आहेत. शनिवारी रात्री त्याचा सहकारी कामावर हजर झाला होता. यावेळी त्याला मनोजकुमार जागेवर दिसला नाही. त्यामुळे त्याने त्याचा शोध घेतला, मात्र त्याला तो कुठेच सापडला नाही. दुसर्या दिवशीही मनोजकुमार कामावर आला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच स्थानिक रहिवाशांनी संबंधित एजन्सीला कॉल करुन मनोजकुमारविषयी विचारणा केली.
मात्र एजन्सीच्या कर्मचार्यांनाही त्याच्याविषयी काहीच माहिती नव्हती. त्याने त्यांना काहीच माहिती दिली नाही. याच दरम्यान पाच वाजता इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीत सुरक्षारक्षकांना मनोजकुमारचा मृतदेह सापडला. त्याचे दोन्ही हातपाय कपड्याच्या दोरीने बांधले होते. त्यापूर्वी त्याची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. त्याच्या गळ्यावर व्रण दिसून आले होते. या घटनेनंतर त्यांनी ही माहिती जुहू पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याचा मृतदेह नंतर कूपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.
त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्यात मनोजकुमारची गळा आवळून हत्या करुन नंतर त्याचे हातपाय बांधण्यात आले होते, त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून मारेकर्यांनी हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. अभिजीत इमारतीच्या पुर्नविकासाचे काम सुरु होणार होते. त्यामुळे कमिटीने सर्व सुरक्षारक्षकांना आणखीन काही महिने तिथे काम करण्यास सांगितले होते. शनिवारी रात्री त्याला काही रहिवाशांनी पाहिले होते, रात्री बारानंतर तो अचानक गायब झाला होता. पाण्याची टाकी पाहिल्यानंतर या हत्येचा पर्दाफाश झाला होता. दरम्यान या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत जुहू पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहे.
याप्रकरणी मनोजकुमारचा आतेभाऊ बलराम यादव याच्या तक्रारीवरुन जुहू पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. काही संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीनंतर हत्येमागील कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या हत्येमागे पूर्ववैमस्न, आर्थिक वाद तसेच इतर कुठले कारण आहे याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.