विवस्त्र फोटो पाहिले म्हणून शेअर व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी

दोन वर्षांत साडेअठरा लाखांची खंडणी वसुली केल्याचे उघडकीस

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ सप्टेंबर २०२६
मुंबई, – इंटाग्रामवर चॅट करताना तरुणीने पाठविलेले विवस्त्र फोटो पाहिले म्हणून एका शेअर व्यावसायिकाला ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी व्यावसायिक तक्रारदाराच्या तक्रारीवरुन मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी खंडणीसाठी धमकाविणार्‍या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. गेल्या दोन वर्षांत या आरोपींनी व्यावसायिकाकडून साडेअठरा लाखांची खंडणी वसुली केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

३५ वर्षांचे व्यावसायिक चेंबूर परिसरात राहत असून त्यांचा शेअर खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. १२ डिसेंबर २०२४ रोजी ते टेलिग्रामवर सर्फिंग करत होते. याच दरम्यान त्यांना देविका गुप्ता नावाच्या एका तरुणीची फे्रंड रिक्वेस्ट आली होती. त्यांनी ती रिक्वेस्ट स्विकारली होती. त्यानंतर त्यांच्या चॅटवर संभाषण सुरु झाले होते. याच दरम्यान त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. या संभाषणादरम्यान तिने त्यांना तिचे विवस्त्र फोटो पाठवून त्यांना एकट्याला भेटण्यासाठी बोलाविले होते. मात्र त्यांनी तिला भेटण्यास नकार दिला होता.

तरीही ती त्यांना वारंवार मॅसेज करुन भेटण्यासाठी बोलत होती. त्यांनी नकार दिल्यानंतर तिने तिचे विवस्त्र फोटो पाहिले आहेस, तू भेटायला आला नाहीतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली होती. तसेच मी मागणी करेल तसे त्यांना पैसे द्यावे लागतील अशी धमकी दिली होती. मात्र त्यांनी तिच्या धमकीकडे विशेष लक्ष दिले नाही.

याच दरम्यान त्यांना रौनक मिश्रा नावाच्या एका व्यक्तीने व्हॉटअपद्वारे धमकी देण्यास सुरुवात केली होती. देविकाचे विवस्त्र फोटो पाहिले असून त्याने तिला पैसे दिले नाहीतर परिणाम वाईट होईल तसेच त्यांची सोशल मिडीयावर बदनामी करण्याची धमकी दिली होती. बदनामीच्या भीतीने त्यांनी त्यांना १२ डिसेंबर २०२४ ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत टप्याटप्याने १८ लाख ५० हजार १५५ रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते. तरीही आरोपी त्यांना पैशांसाठी सतत धमकी देत होते.

त्यांच्या धमक्यांना कंटाळून त्यांनी मध्य सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित आरोपीविरुद्ध पोलिसांनी खंडणीसह फसवणुक तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे त्या सर्व बँक खात्यासह खातेदाराची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page