मुंबई, (प्रतिनिधी) – मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव समिती आयोजित भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव शुक्रवारी १९ एप्रिलला सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत अत्यंत उत्साहात, मोठ्या थाटामाटात दिमाखात मुंबई मराठी पत्रकार संघाच्या हॉलमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्या. मकरंद कर्णिक, न्या. सारंग कोतवाल, न्या. अभय आहुजा, न्या. शर्मिला देशमुख उपस्थित होते. उपस्थित राहिलेल्या चारही न्यायमूर्तींनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. याप्रसंगी मा. मुख्य महानगर दंडाधिकारी एम. आर. ए शेख आणि सहकारी न्यायाधिश उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिगंबर निकम, उच्च न्यायालयातील कर्मचारी, लघुवाद न्यायालयातील प्रबंधक, कर्मचारी, मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयातील प्रबंधक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रमाला शोभा आली आणि कार्यक्रम यशस्वी झाला. अशा या नेत्रदिपक सोहळ्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी अश्रक परिश्रम घेऊन कार्यक्रम सुनियोजित, नीटनेटका, आटोपशी आणि शिस्तीत पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे या समितीचे अध्यक्ष शरद साळवे, कार्याध्यक्ष रवी पवार, सचिव संजय शेलार, सल्लागार चंद्रकांत बनकर, खजिनदार किरण कांबळे तसेच कार्यकर्ते निलेश तायडे, प्रशांत दाभाडे व इतर कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात न्यायालयीन कर्मचार्यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला. अशा प्रकारे जयंतीचे कार्यक्रम दरवर्षी आयोजित झाले पाहिजे, असे सुतोवाच न्या. सारंग कोतवाल यांनी केले. याप्रसंगी न्या. शर्मिला देशमुख यांनी आज मी जी न्यायमूर्ती आहे ती केवळ या महामानवामुळेच आहे. तसेच न्या. कमरंद कर्णिक आणि न्या. अभय आहुजा यांनी या तिन्ही महापुरुषांबद्दल गौरव उद्गार काढले. आपल्या सर्वांवर त्यांचे कसे उपकार आहेत त्याची जाणीव करुन दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शेलार यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद साळवे यांनी केले. आभार प्रदर्शन चंद्रकांत बनकर यांनी केले.