चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर चाकू हल्ला करणारा पती गजाआड
आरोपी पतीचे महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जुलै २०२६
मुंबई, – चारित्र्याच्या संशयावरुन अंजम्मा ऊर्फ शंकरम्मा कृष्णा यादव या ३७ वर्षांच्या पत्नीवर चाकू हल्ला करुन पळून गेलेल्या पतीला अखेर काही तासांत डी. एन नगर पोलिसांनी अटक केली. कृष्णा बलप्पा यादव असे या ३६ वर्षांच्या पतीचे नाव असून त्याचेही एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले आहे. पत्नीच्या चारित्र्यावरुन तसेच पतीचे एका महिलेशी असलेल्या प्रेमसंंबंधातून पती-पत्नीमध्ये वाद होता, याच वादातून हा प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान अटकेनंतर आरोपी कृष्णा यादवला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना सोमवारी सकाळी साडेपाच वाजता अंधेरीतील जुहू गल्ली, न्यू अमर सोसायटी, मेहताब बाबा चाळीत घडली. याच चाळीतील रुम क्रमांक ९८ मध्ये अंजम्मा ही तिचा पती कृष्णा यादव याच्यासोबत राहत असून कृष्णाचा तिथे इस्त्रीचा व्यवसाय आहे. अंजम्माच्या चारित्र्यावर कृष्णा हा नेहमी संशय घेत होता. त्यात तिला कृष्णा याचेही एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याची माहिती समजली होती. त्यामुळे तिने त्याला या महिलेशी बोलू नकोस अशी धमकी दिली होती. मात्र वारंवार सांगूनही तो तिच्या संपर्कात होता. त्यातून त्यांच्यात सतत खटके उडत होते. या वादानंतर तो तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता.
सोमवारी सकाळी साडेपाच वाजता या दोघांमध्ये याच कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर त्याने तिला शिवीगाळ करुन त्याने कुठल्या महिलेशी संबंध ठेवायचे, कोणासोबत बोलायाचे हे सांगू नकोस असे बोलून तुझा आता गेम करतो अशी धमकी दिली. त्यानंतर काही कळण्यापूर्वीच त्याने तिच्यावर चाकूने वार केले होते. त्यात तिच्या गळ्याला, चेहर्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. रक्तबंबाळ झालेली अंजम्मा जागीच कोसळताच तो तेथून पळून गेला होता.
ही माहिती नंतर स्थानिक रहिवाशांकडून प्राप्त होताच डी. एन नगर पोलिसांनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या अंजम्माला स्थानिक रहिवाशांच्या मदतीने पोलिसांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले. तिची प्रकृती आता स्थिर आहे. याप्रकरणी अंजम्माच्या जबानीवरुन घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पती कृष्णा यादव याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यानंतर तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही मोहीम सुरु असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांच्या पथकाने काही तासांत कृष्णा यादवला जुहू गल्ली परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पत्नीच्या चारित्र्यासह स्वतचे एका महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून होणार्या वादातून त्याने अंजम्मावर चाकूने हल्ला केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला मंगळवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून गुन्ह्यांतील चाकू लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.