रुमसह गाळ्यासाठी घेतलेल्या 33 लाखांचा अपहार करुन फसवणुक

फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सराईत महिलेस अकरा महिन्यांनी अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – एका रुमसह तीन गाळ्यासाठी घेतलेल्या सुमारे 33 लाखांचा अपहार करुन एका शेअर मार्केट ट्रेडिंग व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या महिलेस कांदिवली पोलिसांनी अटक केली. निता अंकुश सराईकर असे आरोपी महिलेचे नाव असून ती फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील सराईत आरोपी आहे. तिच्याविरुद्ध फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे बोलले जाते. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती.

अजय नारायण मोकल यांचा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. सध्या ते त्यांच्या वयोवृद्ध आई, पत्नी आणि दोन मुलांसोबत कांदिवलीतील चारकोप परिसरात राहतात. डिसेंबर 2016 ते त्यांच्या भाच्याच्या विवाह सोहळ्याला गेले होते. त्यावेळेस त्यांच्या बहिणीने त्यांची ओळख निता सराईकरशी करुन दिली होती. निताने ती एमएमआरडीएशी संबंधित एका एनजीओमध्ये काम करत असल्याचे सांगितले होते. ती ट्रॅव्हेलचा व्यवसाय सुरु करणार असून त्यासाठी तिला चांगल्या गुंतवणुकदाराची गरज आहे.

काही महिन्यानंतर निताने त्यांना कॉल करुन तिने साईश्रद्धा नावाने टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हेल्सचा व्यवसाय सुरु असल्याचे सांगून त्यांना तिच्यासोबत गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी तिला टप्याटप्याने धनादेश व एनईएफटीद्वारे सुमारे 98 लाख रुपये दिले होते.

ऑगस्ट 2017 रोजी निता ही कांदिवली येथे आली होती. यावेळी तिने अजय मोकल यांची भेट घेऊन रोड कटिंगमध्ये गेलेले रुम आणि गाळे स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून त्यांना त्यात गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी तिला एक रुम आणि तीन गाळ्यासाठी 40 लाख 60 हजार रुपये दिले होते. त्यानंतर तिने त्यांना रुमसह तीन गाळ्याचे अ‍ॅलोटमेंट लेटरची झेरॉक्स प्रत दिली होती. काही दिवसांनी त्यांनी रुमसह गाळ्याबाबत तिच्याकडे विचारणा सुरु केली. मात्र ती विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होती.

तिच्यावर संशय निर्माण झाल्याने त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. यावेळी त्यांना तिला ट्रॅव्हेलिंग व्यवसायासाठी दिलेल्या पैशांतून कोणताही व्यवसाय सुरु केला नव्हता. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. यावेळी तिने 98 लाखांपैकी 54 लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित पैसे परत दिले नाही. तिने दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यामुळे त्यांनी तिच्याविरुद्ध बोरिवली कोर्टात चेक बाऊन्सिंगचा दावा केला होता.

सध्या हा दावा प्रलंबित आहे. याच दरम्यान त्यांनी निताने दिलेल्या अ‍ॅलोटमेंट लेटरची शहानिशा केली असता त्यांना अलोट झालेल्या रुमसह गाळा दुसर्‍या व्यक्तींच्या नावावर असल्याचे दिसून आले. तिने दिलेले एमएमआरडीएचे लेटर बोगस होते. निताने अशाच प्रकारे अनेकांची फसवणुक केली होती. तिच्याविरुद्ध पंधरा वर्षांपूर्वी पंतनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यांत ती जामिनावर असून संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

अशा प्रकारे तिने रुमसह गाळ्याच्या आमिषाने 40 लाख 60 हजार रुपये घेऊन साडेसात लाख रुपये परत करुन उर्वरित 33 लाख 10 हजाराचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी तिच्याविरुद्ध कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी एमएमआरडीएचे बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. अखेर अकरा महिन्यानंतर निता सराईकर हिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page