मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – सोन्याचे दागिने बनविणार्या एका व्यापार्याचे भरदिवसा अपहरण करुन एका फ्लॅटमध्ये कोंडून त्याच्याकडील लाखो रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह कॅशची लुटमार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अपहरणासह दरोड्याचा गुन्हा दाखल होताच वेगवेगळ्या परिसरातून एका महिलेसह सहाजणांच्या एका टोळीला एल. टी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. तारक मैत्री, रघुनाथ मैत्री, दिपक महाडिक, अलका महाडिक, राहुल दिवे आणि सुनिल गोराई अशी या सहाजणांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 75 लाख रुपयांचे 591 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 लाख 35 हजार 500 रुपयांची कॅश असा 77 लाख 35 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टाने शनिवार 18 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. व्यावसायिक वादातून हा प्रकार घडल्याचे पोलीस तपासात उघडकीस आला आहे.
यातील तक्रारदार व्यापारी असून त्यांचा काळबादेवी परिसरात सोन्याचे दागिने बनविण्याचा एक कारखाना आहे. सुनिल गोराई, तारक मैती आणि रघुनाथ मैती हे त्यांच्या परिचित असून ते तिघेही याच व्यवसायाशी संबंधित आहे. गेल्या काही दिवसांपासून तक्रारदार व्यापार्याचे संबंधित तिघांसोबत व्यावसायिक वाद सुरु होता. 14 ऑक्टोंबरला सकाळी साडेदहा वाजता तक्रारदार ओल्ड हनुमान गल्लीजवळील त्यांच्या राहत्या घराजवळ उभे होते. याच दरम्यान तिथे एक महिलेसह चारजण आले. काही कळण्यापूर्वीच या चौघांनी त्यांना एका कारमध्ये कोंबून त्याचे अपहरण केले होते. परळ येथील इमारतीच्या फ्लॅटमध्ये आणून तिथेच त्यांना कोंडून ठेवण्यात आले होते. यावेळी तारक आणि रघुनाथ यांनी त्यांना जुन्या व्यावसायिक वादातून बेदम मारहाण केली होती. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे अपहरण करणारे चारही आरोपी उपस्थित होते.
काही वेळानंतर त्यांनी आपसांत संगनमत करुन त्यांच्याकडील 76 लाख 23 हजार 900 रुपयांचे 591 सोन्याचे दागिने, ऑनलाईन पंधरा हजार आणि 2 लाख 99 हजार रुपयांचा धनादेश असा 79 लाख 37 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल देण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. हा प्रकार कोणालाही सांगितल्यास त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. घडलेल्या घटनेने ते प्रचंड घाबरले होते. त्यामुळे घरी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. त्यांनी त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तक्रारदारांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांची भेट घेऊन त्यांना हा घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित सहाही आरोपीविरुद्ध अपहरणासह दरोडा, फ्लॅटमध्ये कोंडून मारहाण करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांच्या पथकाने वेगवेगळ्या परिसरातून तारक मैत्री, रघुनाथ मैत्री, दिपक महाडिक, अलका महाडिक, राहुल दिवे आणि सुनिल गोराई या सहाजणांना अटक केली. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करुन त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील तारक आणि रघुनाथ नवी मुंबईतील नेरुळ येथे राहत असून त्यांचा दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. दिपक हा वरळी येथे राहत असून तो डॉग ट्रेनर, अलका ही शिवडीची रहिवाशी असून कपडे विक्रीचे काम करते. राहुल हा गोवंडी तर सुनिल हा काळबादेवी परिसरात राहत असून ते दोघेही चालक आणि सोनार काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.