कोलकाता बॉम्बस्फोटासह फायरिंग गुन्ह्यांतील त्रिकुटास अटक

गोवंडीतील एसआरए सोसायटीत शिबपूर पोलिसांसह गुन्हे शाखेची कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 मे 2026
मुंबई, – कोलकाता येथील विधानसभा निवडणुकीदरम्यान दहशतीचे वातावरण निर्माण करुन परिसरात बॉम्ब फेंकून अंधाधुुद गोळीबार करुन पळून गेलेल्या तीन वॉण्टेड आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी गोवंडी परिसरातून अटक केली. शमीम अहमद अब्दुल रशीद, जमील अख्तर अली आणि आफ्ताब अन्वर खुर्शीद अन्वर अशी या तिघांची नावे असून ते तिघेही कोलकाता येथील हावडा, शिबपूरचे रहिवाशी आहेत. या घटनेनंतर ते कोलकाता येथून पळून मुंबईत आले होते. सध्या ते तिघेही गोवंडीतील देवनार, एकता एसआरए सोसायटीमध्ये राहत होते. अटकेनंतर या तिघांनाही शिबपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्यांना पुढील कारवाईसाठी कोलकाता येथे नेण्यात आले आहे.

अलीकडेच कोलकाता राज्यात विधानसभेची निवडणुक पार पाडली होती. या निवडणुकीदरम्यान काही ठिकाणी हिसंक घटना घडल्या होत्या. त्यात शिबपूर पोलीस ठाण्यातील एका घटनेचा समावेश होता. 7 मेला दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास शंभर ते दिडशेहून अधिक गटाने परिसरात अचानक हल्ला केला होता. त्यात बोर या नावाने प्रसिद्ध असलेला आणि माजी नगरसेविकेचा पती शमीम अहमद, आफ्ताफ अन्वर, आझाद मोहम्मद, रिझवान खान, कमलीम, जमील अख्तर, इम्रान अन्सारी, मोहम्मद जावेद, मोहम्मद चाँद, महासिम जावेद ऊर्फ बिकी, बलवंत सिंग, साबीर नसीम, मोहम्मद अन्वरुल हसन, मोहम्मद साजिद यांच्यासह इतर आरोपींचा समावेश होता. या गटाने परिसरात प्रचंड दशहतीचे वातावरण निर्माण करुन बॉम्ब फेकले होते. परिसरात गोळीबार केला होता. त्यायत तक्रारदारासह तीनजण जखमी झाले होते. या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रकरणी तक्रारदाराच्या जबानीवरुन शिबपूर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहिता, शस्त्र अधिनियम, स्फोटक पदार्थ अधिनियमच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत काही आरोपींना नंतर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत शमीम रशीद, जमील अली आणि आफ्ताब अन्वर यांचा सहभाग उघडकीस आला होता. या घटनेनंतर ते तिघेही कोलकाता सोडून पळून गेले होते. त्यांचा शोध सुरु असताना ते तिघेही मुंबईत पळून आले असून सध्या गोवंडीतील देवनार परिसरातील एका एसआरए सोसायटीमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर शिबपूर पोलिसांचे एक विशेष पथक मुंबईत आले होते. या पथकाने गुन्हे शाखेची मदत घेतली होती.

त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, सुशांत सावंत, पोलीस उपनिरीक्षक संदीप रहाणे, महिला पोलीस उपनिरीक्षक माशेरे, पोलीस उपनिरीक्षक बेळणेकर, नार्वेकर, पोलीस हवादार भालेराव, वानखेडे, तुपे, डगळे, गायकवाड, बैलकर, पोलीस शिपाई बोढारे, चालक मगर यांनी देवनार येथील एकता एसआरए सोसायटीच्या आठव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये कारवाई करुन शमीम अली, आफ्ताब अन्वर आणि जमील अली या तिघांना ताब्यात घेतले.

या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. मेडीकलनंतर या तिघांनाही पुढील कारवाईसाठी शिबपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यांना घेऊन संबंधित पोलीस पथक कोलकाता येथे घेऊन गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page