2.83 कोटीच्या पेमेंटचा अपहारप्रकरणी व्यावसायिकाला अटक

प्लास्टिकच्या कच्च्या मालाचा अपहार करुन विक्री केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या 2 कोटी 83 लाख रुपयांच्या अपहार करुन एका व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी मितेश भरत शाह या आरोपी व्यावसायिकाला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत त्याची पत्नी कोमल मितेश शाह ही सहआरोपी असून त्यांची अनंत प्लास्टिक इंडस्ट्रिज नावाची एक खाजगी कंपनी आहे. या दोघांनी तक्रारदारासह इतर व्यावसायिकाकडून कोट्यवधी रुपयांचा प्लास्टिक कच्चा माल घेऊन त्याची परस्पर विक्री करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर मितेशला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

व्यवसायाने व्यावसायिक असलेले मनिष अशोक शर्मा हे कांदिवली परिसरात राहतात. त्यांचा गेल्या पंधरा वर्षांपासून प्लास्टिकचा कच्वा माल पुरविण्याचा व्यवसाय आहे. त्यांची राधेकृष्णा पॉलिमर्स नावाची कंपनी असून मालाड येथे त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. त्यांचे परिचित व्यावसायिक त्यांच्याकडून क्रेडिटवर कच्चा माल घेऊन त्याचे पेमेंट पंधरा ते तीस दिवसांत करतात. हा संपूर्ण व्यवहार विश्वासावर चालतो. दोन वर्षांपूर्वी त्यांची मितेश शाहशी ओळख झाली होती. त्याने त्यांच्याकडे कच्च्या मालाची मागणी केली होती. त्यांची ऑर्डर मोठी होती. त्यामुळे मितेश हा स्वत त्यांच्या मालाड येथील कार्यालयात आला होता. त्याने त्याची वसई येथे अनंत प्लास्टिक इंडस्ट्रिज नावाची कंपनी असल्याचे सांगून त्याच्यासह त्याची पत्नी कोमल कंपनीत संचालक म्हणून काम करतात. त्याच्या वडिलांपासून त्याचा प्लास्टिकच्या वस्तू बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांचे अनेक बड्या व्यावसायिकाशी चांगले संबंध आहेत. त्यांच्याशी त्यांचे चांगले आर्थिक आणि कौटुंबिक संबंध आहेत.

त्याच्याशी व्यवहार केल्यास आगामी काळात त्यांना त्यांच्या व्यवसायात चांगला फायदा होईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची ऑफर चांगली वाटल्याने मनिष शर्मा यांनी त्याच्याशी व्यवहार करण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे 5 ऑक्टोंबर 2023 रोजी सुमारे तेरा तर 6 ऑक्टोंबरला पावणेपंधरा लाखांचा माल त्यांच्या वसई येथील कारखान्यात पाठविला होता. याच दरम्यान त्याने त्यांना अ‍ॅमेझॉन आणि डिमार्ट कंपनीकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी त्याला तीस दिवसांच्या क्रेडिटवर माल पाठविण्याची विनंती केली होती. तीस दिवसांत त्यांचे संपूर्ण पेमेंट करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्याला मार्च ते मे 2024 या कालावधीत 4 कोटी 26 लाख 97 हजार 655 रुपयांच्या मालाची डिलीव्हरी केली होती. त्यापैकी काही रक्कम त्याने त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती.

मात्र 2 कोटी 83 लाख 22 हजार 269 रुपयांचे पेमेंट दिले नव्हते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी मितेश आणि कोमल शाहकडे पेमेंटविषयी विचारणा सुरु केली होती. मात्र ते दोघेही त्यांच्या कंपनीला मोठमोठी ऑर्डर मिळत असल्याने पेमेंट देण्यास विलंब होत आहे, त्यांना काही कंपन्यांकडून पेमेंट आले नाही. जीएसटीमुळे त्यांना प्रॉब्लेम झाला आहे, मात्र त्यांचे पेमेंट लवकरच दिले जाईल असे आश्वासन दिले जात होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांची चौकशी सुरु केली होती.

या चौकशीदरम्यान त्यांना मितेश आणि कोमल यांनी त्यांच्यासह इतर व्यावसायिकाकडून कोट्यवधी रुपयांच्या मालाची डिलीव्हरी घेतली होती, मात्र वेळेवर पेमेंट न करता त्यांची फसवणुक केली होती. विविध व्यावसायिकाकडून घेतलेल्या मालाची परस्पर विक्री करुन त्यांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार करुन फसवणुक केली होती. त्यांनी दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते. मितेश आणि कोमल शाह यांच्याकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांच्याविरुद्ध मालाड पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दोन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या मितेश शहा याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page