फ्लॅटच्या बहाण्याने फुल विक्रेत्याची २० लाखांची फसवणुक

मालाड येथील घटना; पैशांची समान वाटणी करुन फसवणुक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ एप्रिल २०२४
मुंबई, – फ्लॅटच्या बहाण्याने एका फुल विक्रेत्याची चारजणांच्या टोळीने सुमारे २० लाखांची फसवणुक केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चारही आरोपीविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत मधुसुदन गिरणीकर ऊर्फ विशाल किशोर तोंडपे, राजेश जाधव ऊर्फ योगेश चंदूलाल कमानी जावेद खान आणि आसिफ मकसूद खान अशी चौघांची नावे आहेत. फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची समान वाटणी करुन या चौकडीने फुल विक्रेत्याची फसवणुक करुन फ्लॅट देणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे पळून गेलेल्या या चौघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

शिवकुमार रामनाथ गुप्ता हा फुल विक्रेता असून ते त्याच्या कुटुंबियांसोबत जोगेश्‍वरी येथे राहतात. त्यांना त्यांच्या कुटुंबियासाठी एक फ्लॅट घ्यायचा होता. गेल्या वर्षी जून महिन्यांत ते मालाड येथील येथील एका मॉलमध्ये गेले होते. तिथे त्यांना राजेश जाधव याच्या हॅप्पी होम्स नावाच्या प्रॉपटी डिलर कार्यालयाची जाहिरात दिसली होती. त्यामुळे ते कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी राजेशला अंधेरी येथे एक फ्लॅट घ्यायचा आहे असे सांगितले. राजेशने त्यांना त्यांचा बजेट विचारुन अंधेरी येथे चार फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगून एका फ्लॅटमालकाला तातडीने पैशांची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला तो फ्लॅट स्वस्तात मिळवून देतो असे सांगितले होते. त्यामुळे ते त्याच्यासोबत अंधेरीला फ्लॅट पाहण्यासाठी गेले होते. अंधेरीतील डी. एन नगर, स्विसहाईट टॉवरमध्ये आणल्यानंतर त्याने त्यांना विसाव्या मजल्यावरील २००१ क्रमांकाचा फ्लॅट दाखविला होता. हा फ्लॅट त्यांना आवडला होता. त्यामुळे तोच फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. चर्चेअंती त्यांच्यात ८५ लाखांमध्ये फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा सौदा झाला होता. त्यापैकी २० लाख रुपये त्यांनी त्याच्या मालाड येथील कार्यालयात दिले होते. यावेळी तिथे प्रशांत गिरणीकर नावाचा एक व्यक्ती होता. तो फ्लॅट त्याच्या मालकीचा असल्याने त्याने सांगितले होते. इतर दोघांमध्ये आसिफ खान आणि जावेद अन्सारी यांचा समावेश होता. ते दोघेही त्याचे पार्टनर असल्याचे सांगून त्याने त्यांची ओळख करुन दिली होती. २० लाखांचे पेमेंट झाल्यानंतर त्यांना रजिस्ट्रेशन करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते, मात्र एक आठवडा होऊन राजेशने फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करुन दिले नव्हते. तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे ते त्याच्या मालाड येथील कार्यालयात गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना कार्यालय बंद असल्याचे दिसून आले.

ऑगस्ट २०२३ रोजी त्यांना राजेश भेटला, तो त्याचे कार्यालय दुसर्‍या ठिकाणी शिफ्ट करत होता. त्याला फ्लॅटसह पैशांबाबत विचारणा केल्यानंतर त्याने त्यांनी दिलेले २० लाख रुपये आम्ही चौघांनी आपसांत वाटून घेतले आहे. त्यामुळे त्यांना फ्लॅट मिळणार नाही आणि फ्लॅटसाठी दिलेले पैसे परत करणार नाही असे सांगून त्याने निघून जाण्यास सांगितले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच शिवकुमार गुप्ता यांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बोगस फ्लॅटमालक प्रशांत गिरणीकर, प्रॉपटी डिलर राजेश जाधव, त्याचे पार्टनर आसिफ खान आणि जावेद खान यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या या चौघांचा पोलिसांकडून शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page