अपघाताचा बनाव करुन ६० लाखांच्या सोन्याचा दागिन्यांचा अपहार

कंपनीच्या कर्मचार्‍यासह सहकार्‍याला संपूर्ण मुद्देमालासह अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जून २०२६
मुंबई, – अपघाताचा बनाव करुन सुमारे ६० लाखांच्या विविध सोन्याच्या दागिन्यांचा अपहाराचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी कंपनीच्या कर्मचार्‍यासह त्याच्या सहकार्‍याला पोलिसांनी अटक केली. अविनाश गंगाधर कदम आणि मनोज हणमंत जोगदंड अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून गुन्ह्यांतील ६० लाख ६६ हजार ६५६ रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. अटकेनंतर दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. मौजमजेसह झटपट श्रीमंतीसाठी त्यांनी हा गुन्हा केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांनी सांगितले.

कांचन पांडुरंग पवार हे विरार येथे राहत असून अंधेरीतील एमआयडीसी, सिप्झ गेट क्रमांक एकसमोरील गोल्ड स्टार इलिट ज्वेल्स कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कंपनीत विविध हिरेजडीत सोन्याचे दागिने बनविण्यासाठी येतात. त्यासाठी संबंधित कंपनीकडून त्यांना कच्चा माल पुरविण्यात येतो, त्यानंतर ते कंपनीला विविध सोन्याचे दागिने बनवून देतात. ते दागिने डिलीव्हरी करण्याची जबाबदारी सहा कर्मचार्‍यावर आहे. ६ जूनला सायंकाळी संजय मांडवकर यांनी कँरटनेल ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडला ६० लाख ६५ हजार ६५२ रुपयांचे विविध सोन्याचे दागिने डिलीव्हरीसाठी अविनाश कदम या कर्मचार्‍याला दिले होते.

तो कंपनीतून दागिने घेऊन निघाला, मात्र बराच वेळ होऊन परत आला नव्हता. त्याचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे त्यांनी संबंधित कंपनीला कॉल केला असता त्यांचा कर्मचारी अविनाश कदम हा सोन्याचे दागिने घेऊन आला नाही असे समजले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी ही माहिती कांचन पवार यांना दिली होती. चौकशीदरम्यान त्यांना अविनाशचा भंगार गल्लीत अपघात झाला असून त्याच्यावर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्याला नंतर कूपर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. या माहितीनंतर कंपनीचे संचालकासह इतर वरिष्ठ अधिकारी अविनाशची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे त्याने दिवसभर काहीच खाल्ले नसल्याने त्याला अचानक चक्कर आली. त्याने एका पिकअप टेम्पोला धडक दिली.त्यात तो बेशुद्ध झाला. याच दरम्यान कोणीतरी सोन्याचे दागिने असलेली बॅग घेऊन पलायन केल्याचे सांगितले.

त्याचे एकूणच वर्तन संशयास्पद वाटत होते. अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली नव्हती. तरीही तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहण्याचा आग्रह करत होता. त्यानेच अपघाताचा बनाव करुन दागिन्यांचा अपहार केल्याचा कांचन पवार यांना संशय वाटत होता. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार एमआयडीसी पोलिसांना सांगून कंपनीच्या वतीने तक्रार करुन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. अपघाताच्या ठिकाणाचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याची पाहणी करण्यात आली.

या फुटेजमध्ये एक तरुण तिथे बराच वेळ संशयास्पद फिरताना दिसून आला होता. हाच धागा पकडून पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक महेश गुरव, पोलीस उपनिरीक्षक किरण पर्बत, पोलीस हवालदार बडे, पोलीस शिपाई जाधव, लोखंडे, कदम, शिंदे, पवार, विशाल पिसाळ यांनी संबंधित संशयित व्यक्ती मनोज जोगदंड याला ताब्यात घेतले.

त्याच्या चौकशीत त्यानेच अविनाशसोबत अपघाताचा बनाव करुन कंपनीच्या सुमारे ६० लाख ६६ हजार रुपयांच्या विविध सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्यासह कंपनीचा कर्मचारी अविनाश कदम या दोघांनाही पोलिसांनी अटक् केली. त्यांच्याकडून अपहार केलेले सर्व दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. यातील मनोज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page