२१ वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या दोन आरोपींना अटक

जामिनावर बाहेर आल्यानंतर बोगस नावाने वास्तव्यास होते

0

क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जून २०२६
मुंबई, – दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत गेल्या एकवीस वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या दोन आरोपींना डी. एन नगर पोलिसांच्या तडीपार कक्षेच्या अधिकार्‍यांनी अंधेरी येथून अटक केली. गुलाम नादर गुलाम रसुल शेख आणि मोहम्मद गुलाम नबी ऊर्फ मोहम्मद जमाल मोहम्मद उस्मान शेख अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. दोन्ही आरोपी अभिलेखावरील जाहिरनामामधील गुन्हेगार असून जामिनावर बाहेर आल्यानंतर ते बोगस नावाने परिसरात वास्तव्यास असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या वृत्ताला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजली वाणी यांनी दुजोरा दिला आहे.

गुलाम नादर हा अंधेरीतील अन्सारी मोहल्ला तर मोहम्मद गुलाम नबी हा अजमेरी मोहल्ला परिसरात राहत होता. २००५ साली या दोघांविरुद्ध मारामारीसह अपघाताच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद झाली होती. या दोन्ही गुन्ह्यांत अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असताना त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी अंधेरीतील लोकल कोर्टाने त्यांना जामिन मंजूर केला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर ते दोघेही पळून गेले होते.

ते दोघेही खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अंधेरी कोर्टाने अटकपूर्व जामिन वॉरंटसह जाहीरनामा जाहीर केला होता. तसेच त्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे स्थानिक पोलिसांना आदेश दिले होते. या आदेशानंतर दोघांचाही पोलिसांकडून शोध सुरु होता. मात्र ते दोघेही सतत पोलिसांना गुंगारा देत होते. तरीही पोलिसांनी त्यांचा शोध सुरु ठेवला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना दोन्ही आरोपी स्वतची ओळख लपवून अंधेरी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजली वाणी, पोलीस हवालदार विजय दुगाणे, महिला पोलीस हवालदार सिमा साबळे, पोलीस शिपाई विनोद घोगळे, अमीत मेहेत्रे, पवनकुमार पटेल आदी पथकाने अंधेरी परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे संशयास्पद फिरणार्‍या गुलाम शेख आणि मोहम्मद गुलाम नबी या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत ते दोघेही जाहीरनामा जारी केलेले अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या दोघांनाही अटक करुन अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page