भांडणात मध्यस्थीसह सिगारेट पिण्याच्या विरोधानंतर कारने फरफरत नेले

कारचालकाला हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जून २०२६
मुंबई, – भांडणात मध्यस्थी करुन पेट्रोल पंपावर सिगारेट पिण्यास विरोध केला म्हणून रागाच्या भरात पेट्रोल पंपाच्या एका कर्मचार्‍याला आरोपीने त्याच्या कारने फरफरत नेल्याची घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली. या घटनेत प्रमोद बाबूराव सुकाळे या कर्मचार्‍याला दुखापत झाली असून प्राथमिक उपचारानंतर त्याला सोडून देण्यात आले. त्याच्या तक्रारीवरुन कस्तुरबा मार्ग पोलिसांनी आरोपी कारचालक ब्रिजलेश शामभवन दुबे याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत रविवारी त्याला अटक करुन लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना रविवारी रात्री साडेबारा वाजता बोरिवलीतील मागाठाणे एचपी पेट्रोलपंपमध्ये घडली. प्रमोद सुकाळे हा मिरारोडच्या शिवशक्तीनगर, बजरंग वाळीत राहत असून सध्या मागाठाणे एचपी पेट्रोलपंपावर कॅशिअर तर हेमंत सावंत हा सुपरवायझर म्हणून काम करतो. १४ जूनला दुपारी दोन वाजता तो नेहमीप्रमाणे कामावर हजर झाला होता. रात्री साडेअकरा वाजता तो घरी जाण्यासाठी निघाला होता. यावेळी त्याला हेमंत सावंत यांच्यासोबत एक व्यक्ती वाद घालत होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्यात मध्यस्थी करुन वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. चौकशीनंतर त्यांच्याकडे संदीप दुबे हा कामाला होता. त्याला हेमंत सावंत यांनी कामावरुन काढून टाकले होते.

भांडण करणारा व्यक्ती संदीपचा भाऊ ब्रिजलेश दुबे हा भाऊ आहे. भावाला कामावरुन काढून टाकल्याचा जाब विचारण्यासाठी तो तिथे आला होता. त्याच्या मनात हेमंतविषयी प्रचंड राग होता. यावेळी ब्रिजलेशच्या हातात सिगारेट होते, त्यामुळे प्रमोद सुकाळे याने त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न करुन त्याला पेट्रोलपंपावर सिगारेट पिऊ नकोस. नाहीतर मोठा अनर्थ होईल असे सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने त्याच्या अंगावरुन कार चढविण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रमोदने कारचा बोनेट पकडला होता.

याच परिस्थितीत ब्रिजलेशने कार वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या दिशेने सुसाट पळविली होती. या प्रकारामुळे प्रमोदच्या जिवावर बेतू शकते ही माहिती असताना त्याने कार न थांबविता त्याला काही अंतर नेले. त्यानंतर त्याने दोन ते तीन वाहनांना जोरात धडक दिली होती. या अपघातात प्रमोदला दुखापत झाली. या घटनेची माहिती प्राप्त होताच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी प्रमोद सुकाळे याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ब्रिजलेश दुबे याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर ब्रिजलेशला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page