गुंतवणुकीवर पाच टक्के परताव्याचे गाजर दाखवून ४७ लाखांची फसवणुक

वयोवृद्धेच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जून २०२६
मुंबई, – गुंतवणुकीवर पाच टक्के परताव्याचे गाजर दाखवून एका वयोवृद्ध महिलेची सुमारे ४७ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार बोरिवली परिससरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी धीरज पी. भारद्वाज या मुख्य आरोपीविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांत धीरजला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

६५ वर्षांच्या तक्रारदार वयोवृद्ध शुभांगी रमेश सावंत या बोरिवलीतील विठ्ठलनगरात राहतात. तिचे पती एका नामांकित बँकेत मॅनेजर म्हणून कामाला होते, कोव्हीड काळात त्यांचे निधन झाले होते. तिची नात त्रिशा ही बोरिवलीतील एका खाजगी शाळेत शिकत असून तिची अर्णा ही वर्गमैत्रिण आहे. तिची आई कामाक्षी गगन नरुला पालक मिटींगसह ओपन हाऊसमध्ये भेटत असल्याने त्यांची चांगली ओळख झाली होती. कामाक्षीचा धीरज भारद्वाज हा भाऊ असून त्यानेच तिचा मुलगा अभिजीत आणि सून नेहल सावंत यांना एका आकर्षक योजनेत गुंंतवणुक करण्यास सांगितले होते.

या गुंतवणुकीवर त्यांना पाच टक्के परताव्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे तिच्या मुलासह सूनेने एफडी तोडून शुभांगी सावंत हिच्या नावाने गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत त्यांच्यात जुलै २०२४ रोजी एक करार झाला होता. या करारानंतर त्यांनी धीरजला ४७ लाख रुपये गुंतवणुकीसाठी दिले होते. या गुंतवणुकीवर धीरजने त्यांना ऑगस्ट २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत पाच टक्क्याप्रमाणे २३ लाख ४७ हजार रुपये परतावा दिला आहे.

त्यांच्यात ठरलेल्या कराराप्रमाणे २ लाख ३५ हजार रुपये अपेक्षित होते. मात्र ठरल्याप्रमाणे त्याने परताव्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे त्यांनी गुंतवणुक केलेल्या मूळ रक्कमेची त्यांच्याकडे मागणी सुरु केली होती. मात्र तो तिला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. सतत पैशांची मागणी होत असल्याने त्याने तिचा फोन ब्लॉक केला होता. धीरजकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर धीरज भारद्वाजविरुद्ध पोलिसांनी पाच टक्के परताव्याचे आमिष दाखवून ४७ लाख रुपयांच्या गुंतवणुक केलेल्या रक्कमेचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून धीरजची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page