साडेतीन हजाराची लाच घेताना दोन आरटीओ एजंटला अटक

ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठी लाचेची मागणी करणे महागात पडली

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जून २०२६
मुंबई, – अंधेरीतील प्रादेशिक परिवहन विभागाने जप्त करुन ब्लॉक केलेले ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण करण्यासाठी चार हजाराची लाचेची मागणी करुन साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना दोन आरटीओ एजंटला सोमवारी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. मुस्तफा नूरमोहम्मद सेलोट आणि राजेंद्र प्रसाद बिंद अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर त्यांना मंगळवारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. एकाच वेळेस दोन आरटीओ एजंटला लाचप्रकरणी अटक झाल्याने इतर आरटीओ एजंटमध्ये एकच खळबळ उडाली होती.

यातील तक्रारदाराचे ड्रायव्हिंग लायसन्स अंधेरीतील प्रादेशिक परिवहन विभागाने जप्त करुन ब्लॉक केले होते. ड्रायव्हिंग लायसन्स परत मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच प्रयत्नात असताना त्यांची मुस्तफा सेलोटशी ओळख झाली होती. त्याने त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण करुन देतो असे सांगून साडेपाच हजाराच्या लाचेची मागणी केली होती. ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्याला चार हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. मात्र लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी त्याच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

११ जूनला तक्रार प्राप्त होताच दुसर्‍या दिवशी संबंधित अधिकार्‍यांकडून तक्रारीची शहानिशा करण्यात आली होती. यावेळी मुस्ताफ सेलोटने तक्रारदाराकडे चार हजाराची लाचेची मागणी करुन साडेतीन हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले होते. तसेच आरटीओ अधिकार्‍यांकडून त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे काम करुन देण्याचे आश्‍वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे सोमवारी तक्रारदार साडेतीन हजाराची लाचेची रक्कम घेऊन गेले होते. यावेळी मुस्तफाने ती रक्कम त्याचा दुसरा आरटीओ सहकारी राजेंद्र बिंद याला देण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी ती रक्कम राजेंद्र बिंदला दिली.

यावेळी तिथे आधीच सापळा लावलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजेंद्र बिंदला आणि नंतर मुस्तफा सेलोट याला अटक केली. या दोघांविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ (अ), १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर या दोघांनाही मंगळवारी दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त हरिदास किल्लेदार, पोलीस निरीक्षक जगदीश मोरे व अन्य पोलीस पथकाने केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजीत सुळे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page