जीएसटी क्रमांकासाठी लाच घेणारा राज्यकर निरीक्षक गजाआड

दहा हजाराची लाचेची रक्कम घेताना झाली कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ जून २०२६
मुंबई, – जीएसटी क्रमांक दिल्याचा मोबदला म्हणून लाच घेणार्‍या राज्यकर निरीक्षकाला मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. संदीप रविराज खलाटे असे या निरीक्षकाचे नाव असून तो सध्या माझगाव येथील वस्तू व सेवाकर विभागाच्या नोडल सातमध्ये कार्यरत होता. दहा हजाराची लाचेची रक्कम घेताना ही कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत त्याला शुक्रवारी विशेष सेशन कोर्टात हजर केले जाणार आहे.

यातील तक्रारदारांनी स्वतचा व्यवसाय सुरु केला होता. त्यासाठी त्यांना जीएसटी क्रमांकाची गरज होती. जीएसटी क्रमांकासाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज केला होता. याच संदर्भात ते माझगाव येथील वस्तू व सेवाकर विभागाच्या नोडल सातच्या राज्यकर निरीक्षक संदीप खलाटे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांना जीएसटी क्रमांक देण्यास मदत करुन त्यासाठी त्यांच्याकडे दहा हजाराच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बुधवारी १७ जूनला त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

या तक्रारीची संबंधित पोलिसांकडून शहानिशा करण्यात आली होती. यावेळी संदीप खलाटे यांनी तक्रारदारांना जीएसटी क्रमांक मिळवून दिल्याबाबत दहा हजाराची लाचेची मागणी करुन ती लाच स्विकारण्याची तयारी दर्शविली होती. या तक्रारीनंतर या अधिकार्‍यांनी वस्तू व सेवाकर विभागात सापळा लावला होता. गुरुवारी संदीप खलाटे यांना तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले.

त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाप्रसाद मुदिराज, पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांनी केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजीत सुळे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page