बँकेच्या तिजोरीतील ३२ लाखांवर मुख्य कॅशिअरकडून डल्ला

आरोपी कॅशिअरविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ जून २०२६
मुंबई, – भुलेश्‍वर येथील एका नामांकित बॅकेत मुख्य कॅशिअर म्हणून कर्मचार्‍यानेच बॅकेच्या तिजोरीतील सुमारे ३२ लाखांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रविंद्र वसंत सुर्वे या कॅशिअरविरुद्ध व्ही. पी रोड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. गेल्या आठवड्यात उघडकीस आलेल्या या घटनेने बँकेतील इतर अधिकारी, कर्मचारी तसेच खातेदारांमध्ये वर्गात एकच खळबळ उडाली होती. या गुन्ह्यांत रविंद्र सुर्वेला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

प्रणय प्रसुना मोहराणा हे कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज परिसरात राहत असून सध्या एका नामांकित बँकेत कामाला आहे. त्यांची नेमणूक भुलेश्‍वर येथील शाखेत डेप्युटी ब्रॅच हेड म्हणून असून त्यांच्यासोबत बँकेत दोन क्लार्क, दोन अधिकारी, एक कॅशिअर असा स्टाफ आहे. याच शाखेत रविंद्र सुर्वे हा नोव्हेंबर २०२५ पासून मुख्य कॅशिअर म्हणून काम पाहत होता. त्याच्यावर बॅकेतील कॅशचा हिशोब ठेवणे, दिवसभरातील जमा झालेल्या कॅशची पडताळणी करुन त्यांच्या स्वाक्षरीने ती कॅश बॅकेच्या स्ट्रॉंग रुममील कॅश तिजोरीमध्ये ठेवणे अशी जबाबदारी होती. ६ जूनला बॅकेचे दिवसभरातील काम संपल्यानंतर त्यांनी त्याला दिवसभरातील कॅश मोजून ती तिजोरीमध्ये ठेवण्यास सांगतले. मात्र त्याने कॅश मोजण्यास नकार देत कोणतीही सूचना न देता बॅकेतील तिजोरीची चावी घेऊन निघून गेला होता.

हा प्रकार प्रणय मोहराणा यांना संशयास्पद वाटला होता, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. दोन दिवसांनी म्हणजेच ८ जूनला सकाळी नऊ वाजता प्रणय मोहराणा हे बॅकेत नसताना त्याने त्यांच्या टेबलावर चावची ठेवून तेथून कोणालाही काहीही न सांगता पलायन केले होते. गेल्या काही दिवसांतील रविंद्र सुर्वे याची वागणुक संशयास्पद होती. त्यामुळे प्रणय मोहराणा यांनी त्याच्याविरुद्ध फोर्ट येथील विभागीय कार्यालयात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर बँकेचे वरिष्ठ अधिकारी अमरदिप गर्जे आणि सिद्धार्थ कुशवाह हे भुलेश्‍वर येथील बॅकेत आले होते. त्यांनी बँकेच्या तिजोरीतील कॅशची पाहणी केली होती.

बँकेच्या नोंदीनुसार तिजोरीत ४३ लाख ७ हजार ३४६ रुपयांची कॅश असणे अपेक्षित होते, मात्र तिजोरीत १० हजार ७३ हजार ९४५ रुपये शिल्लक होते. ३२ लाख ३३ हजार ४०१ रुपये तिजोरीत कमी दिसून आल्याने त्यांनी रविंद्र सुर्वेला कॉल केला, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. वारंवार कॉल करुनही त्याने त्यांचा रिसीव्ह केला नाही. नंतर त्याने त्याचे कॉल ब्लॉक केले होते. या प्रकारानंतर त्यांनी बॅकेतील मुख्य व्यवस्थापक विकास राठी यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी त्यांना स्थानिक पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता.

त्यानंतर प्रणय मोहराणा यांनी बँकेच्या वतीने व्ही. पी रोड पोलीस ठाण्यात रविंद्र सुर्वे याच्याविरुद्ध बॅकेतील सुमारे ३२ लाखांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून रविंद्र सुर्वेची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page