आर्थिक वादातून २३ वर्षांच्या मित्राची चाकूने भोसकून हत्या
हत्येनंतर पळून गेलेल्या मुख्य आरोपीसह तिघांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जुलै २०२६ं
मुंबई, – आर्थिक वादातून रियाज हसरत शेख या २३ वर्षांच्या तरुणाची त्याच्याच मित्राने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना गोवंडी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली. या तिघांनाही गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने अटक करुन त्यांचा ताबा शिवाजीनगर पोलिसांकडे सोपविला आहे. पोप्या ऊर्फ अल्फयाज शेख, मोआज नूर खान ऊर्फ मॅडी आणि आसिफ ऊर्फ ऍण्डी अशी या तिघांची नावे असून यातील पोप्या या कटातील मुख्य आरोपी आहे. या तिघांनाही शुक्रवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.
ही घटना बुधवारी रात्री अकरा वाजता गोवंडीतील शिवाजीनगर, म्हाडा कॉलनीत इमारत क्रमांक ३४/बी मध्ये घडली. याच ठिकाणी रियाज हा राहत असून ते दोघेही लहानपणापासूनचे मित्र आहेत. त्यांच्यात कौटुंबिक सबंध होते. अनेकदा ते दोघेही एकमेकांच्या घरी जात होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होता. त्यात अल्फयाजने रियाजला दिड हजार रुपये दिले होते, मात्र तो त्याला पैसे परत करत नव्हता. त्यामुळे त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. बुधवारी रात्री रियाज हा पाण्याच्या टाकीजवळ उभा होता. यावेळी अल्फयाज व त्याचे दोन मित्र तिथे आले. त्यांच्यात दिड हजार रुपयांच्या उधारीच्या पैशांवरुन वाद झाला होता.
या वादाचे पर्यावसान शाब्दिक बाचाबाची तर नंतर हाणामारीत झाले होते. काही कळण्यापूर्वीच अल्फयाजने रियाजवर चाकूने वार केले होते. पोटात गंभीर दुखापत झाल्याने रियाज हा जागीच कोसळला होता. त्यानंतर ते तिघेही तेथून पळून गेले होते. स्थानिक रहिवाशांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी रक्तबंबाळ झालेल्या रियाजला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु होते, उपचार सुरु असताना रात्री एक वाजता रियाजचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हजरत अली अब्दुल गणी शेख यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. त्यासाठी सहा विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. ही शोधमोहीम सुरु असताना नवी मुंबईतील नेरुळ परिसरातून अल्फयाज शेख, आसिफ ऊर्फ ऍण्डी आणि मोआज नूर खान ऊर्फ मॅडी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच रियाजची हत्या केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या तिघांनाही पुढील चौकशीसाठी शिवाजीनगर पोलिसांकडे सोपविण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त समीर शेख, नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भरत घोणे, प्रदीप पगारे, भिमराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज निंबाळकर, होनाजी चिरमाडे, रमेश चव्हाण, कृष्णांत माने, पोलीस उपनिरीक्षक भगत, दौंड, पोलीस हवालदार सुधीर मोरे, दिपक भोईटे, हरिबा भोसले, तितकारे, पोलीस शिपाई लक्ष्मण कारंडे, दुर्गेश राणे, अक्षय अभंग, मखरे, अमोल जाधव, हारवे, संदीप मोहिते, शकील तांबोळी, पोलीस निरीक्षक सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ काळे, श्रीकांत काळे, पोलीस उपनिरीक्षक नाणेकर, रहाणे, देसाई, पोलीस हवालदार गायकवाड, वानखेडे, पोलीस शिपाई बोधरे, सायबर विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अजय गोल्हार, पोलीस हवालदार दशरथ राणे आदी पथकाने केली.