मार्च महिन्यांत झालेल्या हत्येचा पर्दाफाश करुन दोन बंधूंना अटक
गळ्यासह दोन्ही हात कापून मुंडके वेगळे करुन तुकडे मृतदेहाची विल्हेवाट
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जुलै २०२६
ठाणे, – मार्च महिन्यांत मुंब्रा येथे क्षुल्लक वादातून एका २३ वर्षांच्या तरुणाच्या झालेल्या हत्येचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. हत्येचा कुठलाही पुरावा नसताना गुन्हे शाखेने दोन्ही आरोपी बंधूंना अटक केली. फैज सुल्तान मालिम आणि अल्बान सुल्तान मालिम अशी या दोघांची नावे असून ते दोघेही ठाण्यातील शीळ, डायघरच्या भंडार्ली उत्तरशीव परिसरातील रहिवाशी आहे. या दोघांनी त्यांचाच मित्र अमन मुस्तकीन शेख याची गळ्यासह दोन्ही हात कापून मुंडके वेगळे करुन मृतदेहाची विल्हेवाट लावून पलायन केल्याची कबुली दिली आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
अमन हा मुंब्रा येथील देवरीपाडा, रशीद कंपाऊंडमध्ये राहत होता. फैज आणि अल्बान हे दोघेही त्याचे मित्र असून फैज हा रिक्षाचालक म्हणून काम करतो. मार्च महिन्यांत त्यांच्यात एका क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. याच वादातून या दोघांनी अमनची निर्घृणरीत्या हत्या केली. सुरुवातीला गळ्यावर वार करुन त्याची हत्या करण्यात आली. नंतर त्याचा गळा आणि दोन्ही हात तिक्ष्ण हत्याराने कापून त्याचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी टाकून त्यांनी हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार उघडकीस येताच १३ मार्च २०२६ रोजी मुंब्रा पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते.
हा तपास सुरु असताना उल्हासनगर येथील घटक चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांना मुंब्रा येथील खड्डी गावातील हत्येत फैज मालिम आणि अल्वान मालिम या दोन बंधूंचा सहभाग असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलीस हवालदार गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, मंगेश जाधव, योगेश वाघ, अशोक थोरवे, प्रकाश पाटील, रितेश वंजारी, सतीश सपकाळे, शेखर भावेकर, विक्रम जाधव, पोलीस नाईक संजय शेरमाळे, पोलीस शिपाई प्रसाद तोंडलीकर, बाबूलाल जाधव यांनी फैज आणि त्याचा लहान भाऊ अल्बान यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत या दोघांनी त्यांचा मित्र अमन याची क्षुल्लक वादातून हत्या केल्याची कबुली दिली. १३ मार्चला रात्री ते दोघेही फैजच्या रिक्षातून मुंब्रा येथील श्रीलंका एरिया परिसरात आले होते. तिथे त्यांनी अमनची हत्या केली. त्याची ओळख पटू नये म्हणून पोलिसांनी प्रेताचे मुंडके धडापासून वेगळे केले. ते मुंडके त्यांनी खर्डीगावात टाकले होते. त्यानंतर त्याचे दोन्ही हात आणि उर्वरित मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेंकून हत्येचा पुरावा नष्ट केला होता. विशेष म्हणजे या दोघांनी हत्येसह इतर सर्व गोष्टींचा मोबाईलवरुन शूटींग केले होते. हा मोबाईल त्यांच्याकडून पोलिसांनी जप्त केला आहे. या मोबाईलमधील व्हिडीओ त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे मानला जात आहे. यातील फैजविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात अपहरणासह हत्या, हत्येचा पुरावा नष्ट करणे तसेच मारामारीसह जिवे मारण्याची धमकी देणे अशा दोन गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.