मालकी हक्क नसलेले फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर देऊन महिलांची फसवणुक
४७ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जुलै २०२६
मुंबई, – फ्लॅट बोगस कागदपत्रे दाखवून मालकी हक्क नसलेले दोन फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर देऊन दोन महिलांची सुमारे ४७ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार आग्रीपाडा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध आग्रीपाडा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. साक्षी सचिन पाटोळे आणि सचिन यशवंत पाटोळे अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
चारुशिला दाजीराम सकपाळ ही महिला आग्रीपाड्याच्या धोबीघाट परिसरात राहते. तिच्या मालकीचे सुंदरनगर परिसरात एक फ्लॅट असून हा फ्लॅट नावावर करण्यासाठी तिला पैशांची गरज होती. त्यामुळे तिने तिचा फ्लॅट तीस लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर भाड्याने दिला होता. त्यानंतर ती दुसर्या फ्लॅटच्या शोधात होती. याच दरम्यान तिची ओळख सचिन पाटोळेशी झालीहोती. त्याने तिला ओमकार टॉवरमधील पंधराव्या मजल्यावर १५७७ क्रमांकाचा फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर द्यायचा आहे असे सांगितले होते. या फ्लॅटचा ताबा त्याच्याकडे असून त्याचे कागदपत्रे तिला दाखवून त्याने तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. चर्चेअंती त्यांच्यात २२ लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट भाड्याने देण्याचा करार झाला होता.
मात्र दिलेल्या मुदतीत त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही. फ्लॅटमध्ये काही काम सुरु असून ते काम पूर्ण होताच फ्लॅटचा ताबा मिळेल असे तो तिला सांगत होता. याच दरम्यान त्याने तिला दुसरा फ्लॅट पर्याय म्हणून राहण्यासाठी दिला होता. मात्र आठ दिवसांत फ्लॅटमध्ये काहीजण आले होते. त्यांनी तो फ्लॅट बिल्डरच्या मालकीचा असून त्यांनी तिला फ्लॅट खाली करण्यास सांगितले. त्यांनी तिला सचिन व साक्षी पाटोळे यांनी फ्लॅटचा बेकायदेशीर ताबा घेतला असून त्यांच्याविरुद्ध आग्रीपाडा पोलिसांत गुन्हा दाखल असल्याचे सांगतले. याबाबत तिची पोलिसांकडून जबानी नोंदवून घेण्यात आली. यावेळी तिला संबंधित फ्लॅट पाटोळे कुटुंबियांच्या मालकीचा नसून ते दोघेही सर्वांना तो फ्लॅट त्यांचा असल्याचे सांगत होते.
इतकेच नव्हे तर तिला अंधारात ठेवून त्यांनी तो फ्लॅट २२ लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर देऊन तिची फसवणुक केली होती. याच दरम्यान तिला साक्षी आणि सचिन यांनी अशाच प्रकारे मीना तिपन्ना कोरे नावाच्या नर्सला दुसरा फ्लॅट २५ लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर दिला होता. या दोन्ही फ्लॅटशी त्याचा काहीही संबंध नव्हता. त्याच्या नावावर फ्लॅटचा मालकी हक्क नव्हता. तरीही ते दोन्ही फ्लॅट त्यांचे असल्याचे सांगून त्यांनी चारुशिला सकपाळ हिच्याकडून २२ लाख तर मीना कोरे हिच्याकडून २५ लाख असे ४७ लाख रुपये हेव्ही डिपॉझिट घेऊन त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच चारुशिला सकपाळ हिने आग्रीपाडा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून साक्षी आणि सचिन पाटोळे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंरत या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.