मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2026
मुंबई, – गोरेगाव येथील नेस्को सेंटरमधील ड्रग्जप्रकरणी प्रदीप गुप्ता नावाच्या एका बाऊंसरला वनराई पोलिसांनी अटक केली. ड्रग्ज घेऊन आलेल्या दोन आरोपींची कुठलीही तपासणी न करता त्यांना म्युझिक कॉर्न्स्टमध्ये प्रवेश दिल्याचा प्रदीपवर आरोप असून याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने शुक्रवार 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रदीपच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता दहा झाली आहे. त्यापैकी पाचजणांना शनिवारी कोर्टाने न्यायालयीन तर इतर चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ केली होती.
11 एप्रिलला गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या संगीत कार्यक्रमांत तीन तरुणांना ड्रग्ज पुरविण्यात आले होते. या ड्रग्जचे सेवन केल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला होता तर एका तरुणीवर अद्याप उपचार सुरु आहेत. याप्रकरणी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी रौनक राहुल खंडेलवाल, आकाश बनमारी सामल, सनी विनोद जैन, बालकृष्णन बलराम कुरुप, प्रतिक बिजेश पांडे या पाचजणांना शनिवारी बोरिवली कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती तर इतर चौघांना पोलीस कोठडी सुनावली होती.
त्यांच्या चौकशीत प्रदीप गुप्ता याचे नाव आले होते. कॉर्न्स्टमध्ये विनित गेरेलानी आणि शुभ अग्रवाल हे ड्रग्ज आले होते. या दोघांची कुठलीही तपासणी न करता त्यांना सोडून देण्यात आले होते. त्यासाठी त्यांनी सुरक्षारक्षक असलेल्या प्रदीप गुप्ता याला एक हजार रुपये दिले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला रविवारी दुपारी बोरिवलीतील कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या गुन्ह्यांत त्याच्यासह इतर काही सुरक्षारक्षकाचा सहभाग आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.