ड्रग्जच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या आरोपी महिलेस अटक

सहा कोटीचे एमडीएमए ड्रग्जचा साठा हस्तगत 

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2026
मुंबई, – ड्रग्जच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका आरोपी महिलेस घाटकोपर युनिटच्या अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अश्विनी पोळ असे या महिलेचे नाव असून या गुन्ह्यांत अटक झालेली ती तिसरी आरोपी आहे. या कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत सहा कोटीचे एमडीएमए ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर आश्विनीला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मंगळवारी रात्री घाटकोपर युनिटचे अधिकारी अंधेरी आणि साकिनाका परिसरात गस्त घालत होते. रात्री साडेबारा वाजता अंधेरी-कुर्ला रोड, सेव्हन ऑलिव्ह हॉटेलजवळ काही तरुणांमध्ये वाद सुरु असल्याची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी तिथे धाव घेतली होती. यावेळी पोलिसांना पाहताच एका व्यक्तीने त्याच्याकडील पिशवीत रस्त्यावर फेंकून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पळून जाणार्‍या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीची पाहणी केल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना 26 लाखांचे 104 एमडीएमए ड्रग्जच्या गोळ्या सापडल्या.

चौकशीत त्याचे नाव इरफान अब्बासअली अन्सारी असल्याचे उघडकीस आले. तो तिथे ड्रग्ज गोळ्याच्या डिलीव्हरीसाठी आला होता. मात्र त्याचा प्रयत्न फसला गेला. ताब्यात घेतल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी घाटकोपर युनिट कार्यालयात आणण्यात आले होते. तिथे त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीत त्याने त्याच्या इतर काही आरोपींची नावे सांगितली होती. त्यानंतर त्याच्या एका सहकार्‍याला आणि शनिवारी आश्विनी पोळ हिला पोलिसांनी अटक केली.

या दोघांकडून पोलिसांनी पाच हजार एमडीएमए गोळ्यांचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत सुमारे सहा कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. या ड्रग्जच्या गोळ्या विविध पार्ट्या आणि ड्रग्ज तस्करांना देण्यासाठी बाळगण्यात आले होते. आश्विनी ही या कटातील प्रमुख आरोपींपैकी एक असून ती मुंबईसह ठाणे शहरात ड्रग्ज पुरवठा करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. इरफानच्या अटकेनंतर ती पळून गेली होती, अखेर त्याला टिटवाळा येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.

याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत आतापर्यंत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page