शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा घालणार्‍या त्रिकुटास अटक

आरोपींच्या बँक खात्यात अडीच कोटीचा व्यवहार झाल्याचे उघड

0

अरुण सावरटकर
१ ऑगस्ट २०२६
मुंबई, – शेअर गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका नामांकित कंपनीतून वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून निवृत्त झालेल्या वयोवृद्ध महिलेची सुमारे ३१ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी एका त्रिकुटाला उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. जोस्वा रत्नम कालकुरी, योगेश दिलीप सोळंकी आणि कुणाल कैलास मस्के अशी या तिघांची नावे आहेत. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या तिघांना सायबर ठगांना वेगवेगळ्या बँकेतील खाती पुरविल्याचा आरोप असून तिन्ही आरोपींच्या बँक खात्यात आतापर्यंत अडीच कोटीचा व्यवहार झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत मुख्य आरोपींसह त्यांचे इतर सहकार्‍यांचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

६२ वर्षांची तक्रारदार महिला कृती अशोक अवलानी ही गोरेगाव परिसरात राहते. ती एका खाजगी कंपनीतून वरिष्ठ उपाध्याक्ष म्हणून निवृत्त झाली आहे तर तिचे पती अशोक अवलानी हे वकिल म्हणून काम करतात. सध्या ते दोघेही कल्सल्टन्स म्हणून काम पाहतात. त्यांना शेअरमार्केट गुंतवणुकीबाबत माहिती असल्याने ते नियमित शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करतात. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत तिला व्हॉटअपवर एक लिंक आली होती. त्यात अज्ञात व्यक्तीने तो सॅमको सिक्युरिटी कंपनीचा सीईओ असून ही कंपनी एआय बेस गुंतवणुक करते. त्यात प्रचंड फायदा असून तिची इच्छा असल्याने तिला पंधरा दिवसांची फ्रीमध्ये मेंबरशीप मिळेल असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे तिने गुगलवर कंपनीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी त्याने तिला कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड केले होते. त्यात ६१ सभासद होते, ग्रुपमध्ये वेगवेगळ्या गुंतवणुक योजनेची माहिती दिली जात होती.

अनेकांनी कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेअर योजनेत गुंतवणुक केली होती, त्यात त्यांना प्रचंड फायदा होत असल्याची माहिती संबंधित सभासद ग्रुपमध्ये शेअर करत होते. त्यामुळे तिनेही कंपनीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी तिने कंपनीच्या कस्टमर सपोर्ट हेल्पलाईनवर संपर्क साधला होता. यावेळी तिला श्रुती शर्मा नाव सांगणार्‍या महिलेने शेअर ट्रेडिंगबाबत माहिती देताना तिला आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल असे सांगितले. त्यासाठी तिने तिला कपंनीचा ऍप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त केले होते. त्यात तिने तिची वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची माहिती शेअर करुन रजिस्ट्रेशन केले होते. त्यानंतर तिने वेगवेगळ्या शेअर योजनेत गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तिला कंपनीकडून ठराविक रक्कम परतावा म्हणून मिळत गेला, त्यामुळे तिला कंपनीवर विश्‍वास बसला होता.

गेल्या काही महिन्यांत तिने वेगवेगळ्या शेअरमध्ये ३१ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणुक केली. मात्र तिला मूळ रक्कमेसह गुंतवणुक रक्कमेवर कुठलाही परतावा मिळाला नाही. विचारणा केल्यानंतर गु्रप ऍडमिनसह इतर कर्मचारी वेगवेगळे माहिती सांगून तिला आणखीन गुंतवणुक करण्यास सांगत होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून कंपनीच्या सीईओसह इतर कर्मचार्‍याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी जोस्वा याला बदलूपर, योगेशला बोरिवली तर कुणाल मस्के याला मालाड येथून ताब्यात घेतले.

चौकशीत या तिघांचाही गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात या तिघांनी सायबर ठगांना वेगवेगळ्या बँकेत उघडलेले खाती पुरविले होते, त्यांच्याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम मुख्य आरोपींना दिल्यानंतर त्यांना ठराविक रक्कम कमिशन म्हणून मिळाली होती.

त्यांनी उघडलेल्या बँक खात्यात आतापर्यंत अडीच कोटीचा व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. ही रक्कम त्यांच्यासह इतर ३६ बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. या बँक खात्यात देशभरातील अठत्तीस तर मुंबईतील दहा गुन्ह्यांतील कोट्यवधी रुपये ट्रान्स्फर झाले होते, ती रक्कम नंतर मुख्य आरोपींना पाठविण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page