७७ लाखांचा अपहारप्रकरणी मुख्य आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
चौदा वर्ष उलटूनही फ्लॅट-गाळ्याचा ताबा दिला नाही
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ ऑगस्ट २०२६
मुंबई, – सुमारे ७७ लाखांचा अपहार करुन एका वयोवृद्ध महिलेची फसवणुक केल्याप्रकरणी अमजद अहमद शेख या ५० वर्षांच्या मुख्य आरोपीविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चौदा वर्ष उलटूनही अमजदने तक्रारदार महिलेला कराराप्रमाणे फ्लॅटसह गाळ्याचा ताबा न देता तिची फसवणुक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याला लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अमजदने अशाच इतर काही लोकांना गंडा घातला आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
जेनिफर लॉरेन्स डिसा ही ६१ वर्षांची वयोवृद्ध महिला जोगेश्वरी येथे राहते. पूर्वी ती सांताक्रुज येथील प्रभात कॉलनी रोड, मराठवाडा सोसायटीमध्ये राहत होती. तिची सोसायटी पुर्नविकासात गेल्याने ती सध्या जोगेश्वरी येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहते. तिचा दहिसर येथे एक फ्लॅट होता, या फ्लॅटची तिने ६९ लाखांना विक्री केली होती. या पैशांतून तिला पश्चिम उपनगरात प्रॉपटीमध्ये गुंतवणुक करायची होती. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान तिची अहमद शेखशी ओळख झाली होती.
या ओळखीदरम्यान त्याने त्याच्या मालकीची अंधेरी-कुर्ला रोड, सिनेमॅक्स सिनेमागृहाजवळ एक प्लॉट असून तिथेच तो एसआरए प्रोजेक्ट करणार आहे. त्यामुळे तिने त्याच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक करावी असा सल्ला दिला होता. त्याने तिला प्रत्येकी २२५ चौ. फुटाचा फ्लॅटसह गाळा देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याला २०१२ ते २०१४ या कालावधीत ५२ लाख रुपये धनादेश तर २५ लाख रुपये कॅश स्वरुपात असे ७७ लाख रुपये दिले होते. ही रक्कम अहजदसह त्याची मुलगी आमरा, आझरा आणि फरहाना यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. पेमेंटनंतर त्यांच्यात फ्लॅट आणि गाळ्याबाबत एक करार झाला होता.
ते सर्व दस्तावेज नोटराईज करण्यात आले होते. मात्र त्यात कुठेही त्याने पैशांचा उल्लेख केला नव्हता. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने फ्लॅट आणि गाळ्याचा ताबा दिल्यानंतर मूळ अग्रीमेंट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तिने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडे मूळ अग्रीमेंटची कॉपी मागितली नाही. मात्र चौदा वर्ष उलटूनही त्याने तिला फ्लॅटसह गाळ्याचा ताबा दिला नाही. वारंवार विचारणा करुनही तो तिला वेगवेगळी कारणे सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तिने त्यांच्यातील व्यवहार रद्द करुन त्याच्याकडे फ्लॅटसह गाळ्यासाठी दिलेल्या ७७ लाखांची मागणी सुरु केली होती.
मात्र त्याने तिला पैसे परत केले नाही किंवा तिच्या प्रॉपटीचा ताबा दिला नव्हता. फसवणुकीच्या उद्देशानेच अमजद शेख याने तिच्याशी फ्लॅट आणि गाळ्याचा व्यवहार केल्याचे तिच्या लक्षात आले होते. त्यामुळे तिने घडलेला प्रकार सांताक्रुज पोलिसांना सांगून आरोपी अमजद शेखविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध फ्लॅटसह गाळ्यासाठी घेतलेल्या सुमारे ७७ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अमजदची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचाही पोलिसांकडून तपास सुरु आहे.