मनी लॉड्रिुंगप्रकरणी डिजीटल अरेस्टच्या धमकीप्रकरणी आरोपीस अटक
दिल्लीतील खातेदारांना बँकेत खाती उघडण्यासाठी मदत केल्याचा आरोप
अरुण सावरटकर
१८ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – मनी लॉड्रिुंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टची धमकी देऊन एका ७३ वर्षांच्या वयोवृद्धाची सुमारे पावणेबारा लाखांची फसवणुक केल्याच्या कटातील मुख्य आरोपीस उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. आफ्ताफ अब्दुल करीम रेहमान कुरेशी असे या २७ वर्षीय आरोपीचे नाव असून तो जोगेश्वरीचा रहिवाशी आहे. दिल्लीतील खातेदारांना मुंबईतील विविध बँकेत खाती उघडण्यासाठी आफ्ताबने मदत केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दोन मोबाईलसह दोन सिमकार्ड जप्त केले आहेत. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत करणकुमार ऊर्फ दानिश खातेदार, अभिषेक भरत सहानी, कन्हैया पन्नालाल साह या तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
अब्दुल सावा मरेडिया हे वयोवृद्ध तक्रारदार दहिसर येथील एस. व्ही रोड, मेहेर ऍव्हेन्यू अपार्टमेंटमध्ये राहतात. ते व्यावसायिक असून त्यांचा स्टेनलेसस्टिल भांड्याचा व्यवसाय आहे. भाईंदर परिसरात त्यांचा एक कारखाना आहे. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा असून ते चौघेही नोकरीनिमित्त युएसएला राहतात. २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत त्यांना सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करणार्या प्रदीप सिंग नावाच्या एका व्यक्तीने कॉल केला होता. त्यांच्या आधारकार्डवर दिल्लीतील एका नामांकित बँकेत खाते उघडण्यात आले असून त्यात मनी लॉड्रिंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दिल्लीत एक गुन्हा दाखल असून या गुन्ह्यांत त्यांची चौकशी सुरु आहे. चौकशीत दोषी ठरल्यास त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल, त्यांना दहा वर्षांची शिक्षा होईल अशी भीती दाखवून डिजीटल अरेस्ट करण्यात आले होते.
त्यांच्या बँक खात्याची माहिती काढून त्यांना एका बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. अटकेच्या भीतीने त्यांनी संबंधित् व्यक्तीच्याा सांगण्यावरुन एका बँक खात्यात सतरा लाख सत्तर हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर त्यांची चौकशी बंद झाली होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कांबळे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता कदम, पोलीस हवालदार रवी पाटील, महिला पोलीस हवालदार सोनाली दळवी आणि पोलीस शिपाई अक्षय साळवे आदी पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता.
ही रक्कम ग्लोबल ड्राय फ्रुट नावाने उघडणात आलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाले आहे. ते खाते कन्हैय्या पन्नालाल साह याचे होते. चौकशीत आफ्ताब कुरेशीचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविण्यात आले होते. चौकशीसाठी हजर झालेल्या आफ्ताबची पोलिसांनी चौकशी केली होती. चौकशीत त्याने करणकुमार ऊर्फ दानिश याच्या मदतीने दिल्लीतील दोन खातेदार अभिषेक सहानी आणि कन्हैय्या साह यांचे बँक खाती उघडण्यास मदत केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली होती.
अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. विविध बँकेत म्युल बँक अकाऊंट बनविणारी ही टोळी असून त्यांचा मास्टरमाईंड करणकुमार ऊर्फ दानिश आहे. त्यानेच दिल्लीतील दोन खातेदारांना मुंबईत बोलावून त्याचे बोगस कंपनीच्या नावाने खाती उघडून दिले होते. याच बँक खात्यात तक्रारदारांनी ११ लाख ७० हजाराची रक्कम ट्रान्स्फर केली होती. नंतर ही रक्कम गुन्ह्यांतील मुख्य सायबर ठगांना पाठविण्यात आली होती. तक्रारदारांना कॉल करणारे आयपी ऍड्रेस म्यानमार देशातील असून अशा प्रकारे फसवणुक करणारी ही आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचे उघडकीस आले आहे.