दिड लाखासह एक हजाराच्या दोन लाचप्रकरणी तिघांना अटक
शिक्षण विभागाच्या वरिष्ठ लिपीकासह पोलीस हवालदाराचा समावेश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 मे 2026
मुंबई, – दिड लाखांसह एक हजार रुपयांच्या दोन वेगवेगळ्या लाचप्रकरणी तिघांना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. त्यात चर्नीरोडच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक राहुल विठ्ठल शिंदे आणि खार पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार वसवराज स्वामीनाथ धामगुंडे व खाजगी व्यक्ती संजीतकुमार यांचा समावेश आहे. या तिघांविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियमच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. एकाच दिवशी दोन लाचप्रकरणी तिघांना अटक झाल्याने शिक्षण विभागासह पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार एका शिक्षण संस्थेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांया शिक्षण संकुल संस्थेला अकरावी आणि बारावी वर्गांना प्रथम मान्यता मिळावी यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरु होते. त्यासाठी त्यांनी चर्नीरोडच्या विभागीय शिक्षण उपसंचालकाच्या कार्यालयात रितसर अर्ज केला होता. या अर्जाबाबत त्यांनी तेथील वरिष्ठ लिपीक राहुल शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी त्यांना त्यांच्या फाईलबाबत सविस्तर चर्चा केली होती. त्यांची फाईल क्लिअर करण्यासाठी त्यांच्याकडे दिड लाखांची मागणी केली होती. ही लाच दिल्याशिवाय त्यांच्या संस्थेची फाईल क्लिअर होणार नव्हती. त्यामुळे लाच देण्याची इच्छा नसताना त्यांनी त्यांना दिड लाख रुपये देण्याची तयारी दर्शवून 13 एप्रिल 2026 रोजी त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीची त्याच दिवशी शहानिशा करण्यात आली होती. त्यात राहुल शिंदे यांनी तक्रारदाराच्या शिक्षण संकुल संस्थेच्या अकरावी आणि बारावीच्या वर्गांना मान्यता देण्यासाठी दिड लाखांची मागणी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर मंगळवारी या अधिकार्यांनी संबंधित कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून दिड लाखांची लाचेची रक्कम घेताना राहुल शिंदे यांना संबंधित अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त महेश जाधव, पोलीस निरीक्षक सुनिता दिघे यांनी केली.
ही घटना ताजी असतानाच दुसर्या कारवाईत खार पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार वसवराज स्वामीनाथ धामगुंडे आणि खाजगी व्यक्ती संजितकुमार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या गुन्ह्यांतील तक्रारदार खार परिसरात राहत असून त्यांनी मुलीच्या पासपोर्टसाठी अर्ज केला होता. या पासपोर्टच्या कामासाठी त्यांनी पोलीस हवालदार वसवराज धामगुंडे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांना मुलीच्या पासपोर्टसाठी मदत करण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडे दोन हजाराची मागणी केली होती. चर्चेअंती त्यांच्यात एक हजार रुपये देण्याचे ठरले होते. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी सोमवारी 18 मेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर वसवराज यांनी एक हजाराची लाच घेण्याची तयारी दर्शविली होती.
ही रक्कम त्यांनी संजितकुमारला देण्यास सांगितली. ठरल्याप्रमाणे त्यांनी ती रक्कम त्याच्या बाईकवर ठेवली होती. ही रक्कम घेतल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही लाच त्याने वसवराज धामगुंडे यांच्या वतीने घेतली होती. त्यामुळे या गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. या दोघांविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी 17 मार्च 2026 रोजी खार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार तात्यासाहेब काळे यांना दिड लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत आता पोलीस हवालदार वसतराज धामगुंडे यांना एक हजाराची लाचप्रकरणी अटक झाली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल हारुगडे, पोलीस निरीक्षक रेखाबाई दुधभाते यांनी केली.