पेटीएमवरुन ऑनलाईन सोन्याचे कॉईन खरेदी करुन मैत्रिणीची फसवणुक

गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी मित्राला अटक व कोठडी

0

अरुण सावरटकर
२ सप्टेंबर २०२६
मुंबई, –
कॉल करण्यासाठी मोबाईल घेऊन एका ज्वेलर्स दुकानातून सोन्याचे कॉईन खरेदी करुन मोबाईलच्या पेटीएम ऍपवरुन ऑनलाईन व्यवहार करुन एका तरुणाने तिच्याच मैत्रिणीची फसवणुक केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी मित्राला अखेर वनराई पोलिसांनी अटक केली. झेन ऊर्फ नबील मुनीर खान असे या आरोपी मित्राचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. विश्‍वासाने मोबाईलसह पेटीएमचा पासवर्ड सांगितल्यानंतर झेनने मैत्रिणीचा विश्‍वासघात करुन ऑनलाईन फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

२१ वर्षांची तरुणी तिच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या पठाणवाडी, परिसरात राहते. ती मलबार हिल येथील राजभवन येथे लहान मुलांचा सांभाळ करण्याचे काम करत असल्याने सध्या तिथेच वास्तव्यास आहे. तिचा मोठा भाऊ इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतो. तिच्यासह तिच्या भावाचे दोन वेगवेगळ्या बँकेत बचत खाते असून ते दोन्ही बँक खाते तिने तिच्या पेटीएम ऍपशी लिंक केले आहे. झेन खान हा तिच्या परिचित असून ते दोघेही एकमेकांना गेल्या आठ महिन्यांपासून ओळखतात. या दोघांची सोशल मिडीयावरुन ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्यामुळे ते दोघेही अनेकदा प्रत्यक्षात भेटले होते.

व्हॉटअपवर एकमेकांच्या संपर्कात होते. त्याच्यावर विश्‍वास असल्याने तिने त्याला तिच्या मोबाईल स्क्रिनचा पासवर्ड दिला होता. मात्र पेटीएम ऍपमधून पैसे ट्रान्स्फर किंवा तिच्या खात्यातील रक्कम वापरण्यास परवानगी दिली नव्हती. १४ ऑगस्टला त्याने तिला भेटण्यासाठी बोलाविले होते. तिने होकार दिल्यानंतर तो त्याच्या कारमधून राजभवन येथे तिला घेण्यासाठी आला होता. सकाळी नऊ वाजता ते दोघेही त्याच्या कारमधून गोरेगावच्या दिशेने निघाले होते. सव्वाबारा वाजता ते दोघेही आरे रोडच्या लक्ष्मी निवासमधील एका शॉपजवळ आले होते. कारमध्ये गप्पा मारत असताना झेन हा कोणालाही फोन करण्यसाठी बाहेर गेला. यावेळी त्याने तिचा मोबाईल कॉल करण्यासाठी घेतला होता. फोनवर बोलता बोलता तो काही अंतरावर गेला होता.

पंधरा ते वीस मिनिटाने झेन हा परत आला आणि त्याने तिचा मोबाईल परत दिला. आई आजारी असल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल असे सांगून तो कार घेऊन निघून गेला. तिलाही तिच्या घरी जायचे होते, त्यामुळे ती मालाड येथील घरी निघून गेली. यावेळी झेनने तिला सायंकाळी पुन्हा भेटू असे सांगितले. घरी गेल्यानंतर तिच्या भावाला त्याच्या बँक खात्यातून काही पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज आला होता. त्याने खात्यातील शिल्लक रक्कम तपासली असता अपेक्षित रक्कम नसल्याचे त्याला दिसून आले. त्याने तिच्या मोबाईलचे पेटीएम ऍप ओपन करुन आर्थिक व्यवहाराची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याला तिच्या मोबाईलवरुन दुपारी पाऊणच्या सुमारास ६२ हजार ९०० रुपये सनराईज गोल्ड ज्वेलरी या खात्यात ऑनलाईन ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले. याबाबत त्याने तिला विचारणा केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला.

तिने तिच्या मोबाईलची पाहणी केल्यानंतर झेनने तिच्यासोबत झालेल्या चॅट आणि कॉलचे सर्व डिटेल्स डिलीट केल्याचे दिसून आले. या घटनेनंतर ती तिच्या भावासोबत गोरेगाव येथील सनराईज गोल्ड ज्वेलरी दुकानात गेले होते. तिथे चौकशी केल्यानंतर तिला एका तरुणाने त्यांच्या दुकानातून सोन्याचे कॉईन खरेदी करुन ऑनलाईन पेमेंट केल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने दुकानातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. या फुटेजची पाहणी केल्यानंतर झेन हा दुकानात आल्याचे तसेच त्यानेच सोन्याचे कॉईन खरेदी करुन तिच्या मोबाईलवरुन ऑनलाईन पेमेंट केल्याचे दिसून आले.

यावेळी त्याने त्याचे आधारकार्डचे झेरॉक्स प्रत दुकानात दिले होते. त्यात त्याचे नाव नबील मुनीर खान तसेच तो रुस्तमजी ऑझिओना, एल विंग, सातवा माळा, रुम क्रमांक ७०८, माजिवाडा, ठाणे असा पत्ता दिला होता. हा प्रकार उघडकीस येताच तिने झेनविरुद्ध वनराई पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत झेनविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच झेन हा पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून तपास सुरु होता.

ही शोधमोहीम सुरु असताना पळून गेलेल्या झेनला सोमवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार मैत्रिणीचा विश्‍वासघात करुन त्याने कॉलसाठी मोबाईल घेऊन तिच्या मोबाईलच्या पेटीएम ऍपमधून ऑनलाईन व्यवहार करुन एक सोन्याचे कॉईन खरेदी केल्याची कबुली दिली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page