महानगरपालिकेच्या दुय्यम अभियंतासह कर्मचार्‍याला अटक

सत्तर हजाराची लाचेची मागणी करुन साठ हजार घेताना कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ सप्टेंबर २०२६
मुंबई, – अंधेरीतील महानगरपालिकेच्या के-पश्‍चिम वॉर्डच्या दुय्यम अभियंतासह कर्मचार्‍याला लाचप्रकरणी बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. आरोपींमध्ये दुय्यम अभियंता निरवकुमार चुणीलाल जैसूर आणि कर्मचारी विजय रमेश पाटील यांचा समावेश आहे. या दोघांवर एका बेकरी मालकाकडे सत्तर हजाराची लाचेची मागाणी करुन साठ हजाराची लाच घेताना कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी के पश्‍चिम वॉर्डमध्ये लाचचुलचत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईने तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.

५० वर्षांचे तक्रारदार पश्‍चिम उपनगरात राहत असून त्यांच्या मालकीचे एक बेकरी आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या बेकरीमध्ये मनपा कर्मचारी विजय पाटील आले होते. त्यांनी त्यांना त्यांचा बेकरीचा व्यवसाय सुरु ठेवायचा असल्यास तसेच व्यवसायावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. स्वतसह दुय्यम अभियंता निरवकुमार जैसून यांच्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे लाच स्वरुपात सत्तर हजार मागितले होते. ही लाख दिली नाहीतर त्यांच्या बेकरीवर कारवाई करुन बेकरी बंद करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी त्यांना लाच देण्याची तयारी दर्शवून त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

२ सप्टेंबरला ही तक्रार प्राप्त होताच लागलीच या अधिकार्‍यांनी त्याची शहानिशा केली होती. यावेळी विजय पाटील यांनी स्वतसह निरवकुमार जैसूर यांच्यासाठी सत्तर हजाराची लाचेची मागणी केली होती. तसेच तडजोडीनंतर त्यांच्याकडून साठ हजाराची लाच स्विकारण्याचे मान्य केले होते. या घटनेनंतर या अधिकार्‍यांनी के पश्‍चिम महानगरपालिकेच्या वॉर्ड कार्यालयचातील तळमजल्यावर सापळा लावला होता. यावेळी विजय पाटील यांना साठ हजाराची लाचेची रक्कम घेताना या अधिकार्‍यांनी अटक केली.

या कारवाईनंतर या पथकाने सहाव्या मजल्यावरील कार्यालयातून निरवकुमार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या कारवाईत या अधिकार्‍यांनी निरवकुमार यांच्याकडील दोन मोबाईल, विजय पाटील यांचा एक मोबाईल आणि ४० हजार ८२० रुपयांची अतिरिक्त कॅश जप्त केली आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाप्रसाद मुदिराज, पोलीस निरीक्षक अनिल चित्तरवाड, पोलीस हवालदार मठपती, गावडे, सोनोने, महिला पोलीस हवालदार पाटील, महिला पोलीस शिपाई गवांदे, पोलीस शिपाई वाईगडे, सहाय्यक फौजदार चालक फंटागरे, पोलीस शिपाई चालक दुधाळ यांनी केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजीत सुळे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page