फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड बिल्डरला तीन वर्षांनी अटक
विक्री केलेल्या फ्लॅटची पुर्नविक्री करुन ८३ लाखांना घातला गंडा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ सप्टेंबर २०२६
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या श्रीपाद डेव्हलपर्सचा मालक असलेला बिल्डर उदय कृष्णराव परब याला बोरिवली पोलिसांनी अटक केली. विक्री केलेल्या फ्लॅटची पुर्नविक्री करुन एका व्यावसायिकाला ८३ लाखांना गंडा घातल्याचा उदय परबवर आरोप होता, गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. अखेर त्याला तीन वर्षांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडीनंतर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
प्रशांत अवंतीलाल बोरा हे व्यावसायिक असून कांदिवली परिसरात राहतात. त्यांची पार्श्व इंटरप्रायजेस लिमिटेड नावाची एक खाजगी कंपनी मालाडच्या रामचंद्र लेन काचपाडा, बिझनेस सेंटरच्या जयवंती ऍलाईडमध्ये आहे. याच कार्यालयातून ते हिरे आणि रियल इस्टेटचा व्यवसाय करतात. त्यांना नवीन फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यामुळे ते फ्लॅटचा शोध घेत होते. याच दरम्यान त्यांना श्रीपाद डेव्हलपर्सच्या काही इमारतीच्या प्रोजेक्टची माहिती समजली होती. त्यामुळे ते बोरिवलीतील राम मंदिर रोड, लक्ष्मी कृपामध्ये असलेल्या श्रीपाद डेव्हलपर्सच्या कार्यालयात गेले होते. तिथे त्यांची उदय परबशी ओळख झाली होती. त्यांनी लक्ष्मी कृपा या इमारतीचे पुर्नविकासाचे काम त्यांच्या कंपनीकडे असून याच इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावरील ६१२ चौ. फुटाचा ५०२ क्रमांकाचा टू बीएचके फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते.
इमारतीसह फ्लॅटचा आराखडा दाखवून त्यांनी त्यांना तिथे गुंतवणुक करण्याची त्यांना चांगली संधी आहे. आगामी काळात याच फ्लॅटची त्यांना दुप्पट रक्कम मिळेल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी पत्नीशी चर्चा करुन तिथे फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता. उदय परबची पुन्हा भेट घेतल्यानंतर त्याने त्यांना इमारतीचे काम पूर्ण झाले असून त्यांना पूर्ण पेमेंट करावे लागेल असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी कंपनीच्या बँक खात्यात जानेवारी ते मार्च २०२० या कालावधीत टप्याटप्याने ८३ लाख ३४ हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. ३ जानेवारीला गोरेगाव येथील सह निबंधक दुय्यम निबंधक कार्यालयात फ्लॅट क्रमांक ५०२ चे कायदेशीर रजिस्ट्रेशन झाले होते. रजिस्ट्रेशन फ्लॅटचे काही काम बाकी असून काही दिवसांत त्यांना फ्लॅटचा ताबा दिला जाईल असे सांगण्यात आले.
मात्र प्रत्यक्षात त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही. संपर्क साधल्यानंतर उदय परब यांना प्रतिसाद देत नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी लक्ष्मी कृपा सोसायटीमध्ये जाऊन पाहणी केली होती. यावेळी त्यांना त्यांचा फ्लॅट गर्व जगदीश दवे या व्यक्तीला दिल्याचे समजले. सोसायटीच्या फ्लॅटधारकाच्या बोर्डवर त्याचेच नाव होते. त्यामुळे त्यांनी गोरेगाव येथील सह निबंधक कार्यालयात जाऊन पाहणी केली होती. तिथे त्यांना तो फ्लॅट गर्व दवे याच्या नावावर असल्याचे दिसून आले. उदय परबच्या कंपनीत किरण दिलीप पारेख, रफिक इलियास शेख हे पार्टनर होते, त्यांनीच तो फ्लॅट त्याला विक्री केला होता. विक्री झालेल्या फ्लॅट उदय परबने पुर्नविक्री करुन प्रशांत बोरा यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी उदय परबकडे त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती, मात्र त्याने त्यांना पैसे परत केले नाही. पैशांची मागणी केल्यानंतर त्याने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर उदय परब याच्याविरुद्ध पोलिसांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या ८३ लाख ३४ हजार रुपयांचा अपहार करुन फसवणुक करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिका अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच उदय परब हा पळून गेला होता. त्यामुळे त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविणयत आले होते. गेल्या तीन वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या उदय परबला अखेर गेल्या आठवड्यात पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.