दोन वेगवेगळ्या घटनेत मोलकरणीकडून चौदा लाखांची चोरी

माटुंगा-पवईतील घटना; तिघींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 जून 2025
मुंबई, – घरकाम करताना तीन मोलकरणीने घरातील सुमारे चौदा लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसह कॅश आदी मुद्देमालावर डल्ला मारल्याची घटना माटुंगा आणि पवई परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकणी माटुंगा आणि पवई पोलिसांनी दोन स्वतंत्र चोरीप्रकरणी तीन मोलकरणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सेजल संतोष शिंदे, जया देवाडिका आणि पूजा गोहिल अशी या तिघींची नावे असून त्यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.

पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला स्वाती गणेश पुजारी ही पवई परिसरात राहते. अंधेरीतील एका फार्मासिटीकल कंपनीत सिनिअर मॅनेजर म्हणून काम करते. तिचे सासू-सासरे वयोवृद्ध असल्याने तिने तिच्या घरी दोन महिलांना कामावर ठेवले होते. त्यापैकी मनिषा सोनी ऊर्फ मुन्नी ही तिच्याकडे गेल्या तीन वर्षांपासून तर जया ही दिड वर्षांपासून कामाला होती. तसेच तिच्या अकरा महिन्यांच्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी तिने पूजा गोहिलला कामावर ठेवले होते. पूजा ही 24 मेपासून कामावर आली होती. 18 मे ते 29 मे या कालावधीत तिचे सासू-सासरे हे त्यांच्या कर्नाटक, मंगलोर, उडवी गावी गेले होते. गेल्या आठवड्यात तिला कपाटातील सुमारे सात लाखांचे सोन्याचे दागिने मिसिंग असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे तिने तिन्ही मोलकरणीकडे विशेष लक्ष केंद्रीत केले होते. यावेळी मनिषा आणि जया हे नियमित कामावर येत होते तर पूजा ही एक दिवस काम करुन दुसर्‍या दिवसांपासून कामावर आली नव्हती. तिला संपर्क साधल्यानंतर ती तिच्या गावी गेल्याचे तिला समजले. या चोरीमागे तिच्या घरातील मोलकरणीचा सहभाग असल्याने तिने त्यांच्याविरुद्ध पवई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर जया देवाडिका आणि पूजा गोहिल या दोघींविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

दुसरी घटना माटुंगा परिसरात उघडकीस आली आहे. अशुन हरिष लाहीर हे व्यवसयाने वकिल असून माटुंगा येथील सिद्धाचल सहकारी सोसायटीमध्ये राहतात. त्यांच्याकडे सेजल शिंदे ही 20 मेपासून घरकाम करत होती. त्यासाठी तिला ते दहा हजार रुपये वेतन देण्याचे ठरले होते. 30 मेला त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. घरात पाहुणे येणार असल्याने त्यांची तयारी सुरु होती. याच दरम्यान त्यांच्या पत्नीला कपाटातून विविध सोन्याचे दागिने आणि बारा हजार रुपयांची कॅश असा सात लाख बारा हजाराचे मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी सेजलकडे विचारणा केली, मात्र तिने टोलवाटोलवी करुन फोन कट केला. त्यानंतर तिने तिचा मोबाईल स्विचऑफ केला होता. तिनेच कपाटातून ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन अशुन लाहीर यांनी तिच्याविरुद्ध माटुंगा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सेजल शिंदे हिच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिघींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page