मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 जून 2025
मुंबई, – हेल्थ परवानासाठी पाच लाखांची लाचेची मागणी करुन दोन लाखांचा पहिला हप्ता घेतल्यानंतर दुसरा दोन लाख रुपयांचा हप्ता घेताना महानगरपालिकेच्या एका अधिकार्याला मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. सरबजीतसिंह करतारसिंह बाजवा असे या अधिकार्याचे नाव असून ते सध्या सांताक्रुज येथील एच/पूर्व महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात स्वच्छता निरीक्षक म्हणून कामाला होते. हेल्थ परवानासाठी लाचेची मागणी करणे सरबजीतसिंह बाजवा यांना चांगलेच महागात पडले आहे. याच गुन्ह्यांत वैद्यकीय निरीक्षकाची प्रमोद पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
यातील तक्रारदार व्यावसायिक असून त्यांची स्वतची एक खाजगी कंपनी आहे. त्यांची कंपनीत इतर व्यावसायिकांना हेल्थ परवाना, इमारत परवानगीसह इतर शासकीय कार्यालयातील परवानगी काढून देण्याचे सल्लागार म्हणून काम करते. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या कंपनीसाठी एच/पूर्व मनपाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात हेल्थ परवानगीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी तेथील स्वच्छता निरीक्षक् सरबजीतसिंह बाजवा यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांना हेल्थ परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सांगून त्यांच्याकडे दोन लाखांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन करताना त्यांना दोन लाख रुपये दिले होते.
काही दिवसांनी त्यांना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हेल्थ परवाना प्राप्त झाला होता. त्यानंतर लोकसेवक आणि वैद्यकीय अधिकारी प्रमोद पाटील यांनी तक्रारदाराच्या क्लाईंट यांच्या आस्थापनेची पाहणी केली होती. त्यात त्यांना ऑनलाईन मिळालेले हेल्थ परवाना चुकीचा असून याबाबत त्यांना सरबजीतसिंह बाजवा यांची भेट घेण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांनी प्रमोद पाटील यांच्यासह सरबजीतसिंग बाजवा यांची भेट घेतली होती. यावेळी प्रमोद पाटील यांनी त्यांना नव्याने हेल्थ परवाना देण्यासाठी त्यांच्याकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यांनी हेल्थ परवानासाठी आपण आधीच दोन लाख रुपये दिल्याचे सांगितले, त्यामुळे त्यांनी त्यांना उर्वरित तीन लाख रुपये दिल्यानंतर हेल्थ परवाना देण्याचे मान्य केले होते.
ही लाच दिल्याशिवाय त्यांना हेल्थ परवाना मिळणार नव्हता. त्यामुळे त्यांनी लाच देण्याची तयारी दर्शवून 14 मे 2025 रोजी संबंधित अधिकार्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची या अधिकार्यांकडून शहानिशा करण्यासाठी करण्यात आली होती. यावेळी सरबजीतसिंह बाजवा यांनी तीन लाख रुपयांची लाचेची मागणी करुन तडजोडीनंतर अडीच लाख रुपये घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर या पथकाने गुरुवारी संबंधित विभागात सापळा लावून सरबजीतसिंग बाजवा यांना तक्रारदाराकडून दोन लाखांचा हप्ता घेताना रंगेहाथ पकडे. याच गुन्ह्यांत नंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना शुक्रवारी दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.