सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्‍या आरोपीस अटक

शेअर ट्रेडिंगच्या नावाने एक कोटीचा गंडा घातल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 जून 2025
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीसाठी सायबर ठगांना विविध बँकांचे खाती पुरविणार्‍या एका आरोपीस उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. श्रीशेष व्यकंटराव जाधव असे या आरोपीचे नाव असून याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने अलीकडेच एका व्यक्तीला शेअर ट्रेडिंगच्या नावाने एक कोटींना गंडा घातला होता, त्यापैकी काही रक्कम श्रीशेष जाधवच्या बँक खात्यात जमा झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अविनाश काशिनाथ संखे हे गोरेगाव येथे राहत असून अंधेरीतील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यांत त्यांना एका खाजगी कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आले होते. या कंपनीत शेअर ट्रेडिंगसंदर्भातील माहिती दिली होती. कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास फायदा होईल याची माहिती दैनंदिन माहिती दिली जात होती. ग्रुपमध्ये इतर सभासदांनी शेअरमध्ये गुंतवणुक केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यांनीही शेअरमध्ये गुंतवणुक करावी यासाठी त्यांच्यावर सतत दबाव आणला जात होता. त्यांना गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.

16 जून ते 23 नोव्हेंबर 2024 या कालावधीत त्यांनी संबंधित कंपनीच्या माध्यमातून विविध शेअरमध्ये एक कोटी पाच लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना 84 लाख रुपये फायदा झाला होता. मात्र ही रक्कम काढण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या कारणासाठी पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी ही रक्कम ट्रान्स्फर करण्यास नकार दिल्यानंतर त्यांना प्रतिसाद देणे बंद करण्यात आले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी उत्तर सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच श्रीशेष जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यानेच फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविली होती. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्यानंतर ही रक्कम त्याने सायबर ठगांना पाठविली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page