मित्रांना पार्टी देण्यासाठी साडेपंधरा लाखांची चोरी करुन पलायन

दिल्लीला पळून गेलेल्या आचार्‍याला चोरीच्या मुद्देमालासह अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 जून 2025
मुंबई, – मित्रांना पार्टी देण्यासाठी एका आचार्‍याने त्याच्याच व्यावसायिक मालकाच्या घरी सुमारे सांडेपंधरा लाखांचे विविध हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि साडेचार लाखाची कॅश असा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले, पळून गेलेल्या आरोपीला काही दिवसांत दिडोंशी पोलिसांच्या एका विशेष पथकाने दिल्लीतून चोरीच्या काही मुद्देमालासह शिताफीने अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्याकडून चोरीचा उर्वरित मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे.

गौरव राजेंद्र घुवालेवाला हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड येथील अप्पर गोविंदनगर, वैकुंठ अपार्टमेंट या पॉश सोसायटीमध्ये राहतात. त्यांची ईडीएस इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक ट्रान्सपोर्ट कंपनी असून या कंपनीचे अंधेरी येथे कार्यालय आहे. त्यांच्या घरी दोन महिलांसह सहा कामगार कामाला असून त्यात छोटे मुखिया याचा समावेश होता. तो त्यांच्या घरी आचारी म्हणून कामाला होता. त्यांची बहिण मेघा ही अमेरिकेत राहत असून सुट्टीनिमित्त ती 14 मेला तिच्या मुलीसोबत त्यांच्या घरी आलीहोती. 28 मेला त्यांचे संपूर्ण कुटुंबिय अयोध्या येथे देवदर्शनासाठी गेले होते. मात्र कामामुळे त्यांना तिथे जाता आले नाही.

31 मेला ते सर्वजण अयोध्येहून मुंबईत परत आले होते. रात्री त्यांच्या आईला कपाटातील लॉक उघडे दिसले. त्यामुळे तिने आतील सामानाची तपासणी केली असता तिला अकरा लाख रुपयांचे विविध हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि साडेचार लाखांची कॅश असा साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने गौरव घुवालेवाला यांना ही माहिती सांगितली. त्यांनी संपूर्ण कपाटाची पाहणी केली होती, मात्र त्यांना कुठेही हिरेजडीत दागिने आणि कॅश सापडले नाही. त्यामुळे त्यांनी घरातील सर्व नोकरांची चौकशी सुरु केली होती. मात्र कोणालाही या दागिन्यांसह कॅशबाबत काहीच माहित नव्हते. त्यामुळे त्यांनी दिडोंशी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.

तपासात या चोरीमागे त्यांचा आचारी छोटूवर पोलिसांचा संशय निर्माण झाला होता. मूळचा बिहारचा रहिवाशी असलेला छोटू हा त्यांच्याकडे एक महिन्यांपासून कामाला लागला होता. मात्र तो अचानक नोकरी सोडून निघून गेला हेता. त्याला दारु पिण्याचे व्यसन होते, त्यामुळे त्यानेच ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन पोलिसांनी तपास सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असातनाच तो दिल्लीत पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने दिल्लीतील लजपतनगर परिसरातून छोट मुखियाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. 28 मेला तो गौरव धुवालेवाला यांच्या इमारतीजवळ आला होता. लिफ्टने टेरेसवर गेलयानंतर तो खिडकीतून सहाव्या मजल्यार गेला. त्यानंतर त्याने कपाटातील विविध हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि कॅश असा साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. त्याने त्याच्या मित्रांना पार्टी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र पैसे नसल्याने त्यांनी गौरव घुवालेवाला यांच्या घरी चोरीची योजना बनविली होती. चोरीनंतर तो मुंबईतून दिल्लीला पळून गेला. त्याच्याकडून काही दागिने पोलिसांनी जप्त केले असून उर्वरित सर्व मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेंनतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page